अमळनेर । तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे बर्याच रस्त्यांची दुरावस्था झाली असून पावसाळा सुरू होवून ही किरकोळ व मोठ्या दुरुस्त्या संबंधित विभागाकडून न झाल्यामुळे त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. तर मागील महिन्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जळगाव येथून अमळनेर येथे येत असतांना टाकरखेडा-अमळनेर रस्ता खराब असल्यामुळे एका पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांची विनवणी करून दुसर्या मार्ग बदलवून यावे लागले तर काही मोठ्या वळणार व लहान लहान नाल्यांवरून पाणी वाहत असतांना देखील सूचना फलक नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुंभकर्णाची झोप घेतली असल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यांवरील वळणावर सूचना फलकांचा अभाव
तालुक्यातील प्रमुख मार्गावर नाल्यांवर लहान पुलाचे बांधकाम केलेले आहे. पण बर्याच लहान पुलांवर कठडे व वाहनधारकांना सूचित करण्यासाठी रेडियमचे फलक लावले नसून काही पुलावर एक ते दीड फुटाचे कठडे बांधलेले आहेत. रात्री अंधारात बर्याच वेळेस मोटरसायकल स्वार व मोठे वाहन रस्त्याच्या कडेला उतरल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे त्याठिकाणी रेडियम लावून रात्री वाहन धारकांना सूचित होईल असे फलक लावणे गरजेचे आहे तसे न केल्यास एखादा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर चोपडा अमळनेर रस्त्यावर मोठी मोठी निंबाची वाळलेली वृक्ष तसेच उभे आहेत पावसाळा सुरू झाल्यावरही त्याबाबत कोणतेच नियोजन विभागाने केले नसल्यामुळे एखाद्या वादळात जर ते वृक्ष एखाद्या वाहनावर पडले तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चार महिन्यांपासून रस्त्यांचे काम अपूर्ण
अमळनेर – धुळे मार्गावरील नवलनगरपर्यंत मार्गाची देखभाल सामाजिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु अमळनेर ते मंगरूळपर्यंतच्या रस्त्यावर चार महिन्यापासून खडीचे मोठे ठिगारे बाजूला पडल्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागते तर गेल्या चार महिन्यापासून रस्त्याचे काम ही अपूर्ण आहे. सा.बां. विभागाने ह्याकडे दुर्लक्ष केले आहे तर वाहनधारकांना सूचित करण्यासाठी लावण्यात आलेले दिशादर्शक फलक हे काही ठिकाणी तुटलेले आहेत तर काही ठिकाणी मोडून पडलेले आहेत. ह्या फलकाची दुरुस्ती करणे किंवा त्याठिकाणी नवीन फलक लावण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
पावसाळा सुरू होण्याआगोदर वाहतुकीस अडचण ठरणार्या झाडे, झाडांच्या फाद्या व कोरडे वृक्ष तोडणे गरजेचे असते, मात्र बर्याच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कोरडे वृक्ष तसेच उभे असून एखाद्या वादळात ती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ती कोरडी वृक्ष तोडणे गरजेचे आहे. सार्व.बांधकाम विभागाची मनमानीमूळे अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यात आमच्या विभागाचे काम शासनाने कमी करण्याचा उद्देश असल्यामुळे स्वतःवरील भार कमी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी देखील रस्त्याबाबत दुर्लक्ष करीत आहेत. परंतु दुर्लक्ष करून सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळणार्या अधिकार्यांवर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली आहे.
कठडे तुटल्यामुळे अपघाताची शक्यता
अमळनेर-शिरपूर मार्गावर विविध छोटया नाल्यावर पुलाचे बांधकाम झालेले आहेत. त्याठिकाणीही कठडे बांधण्याची आवश्यकता आहे तर झाडी गावालगत एक मोठा नाला गेलेला असून त्याठिकाणी बांधण्यात आलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने वाहने जावू शकत नाहीत, अशा परिस्थिती जर रात्री जोरदार पाऊस झाला त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने एखादा मोटरसायकल चालकाने जर पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला तर मोठा अपघात होऊन जीवित हानी होवू शकते.