अमळनेर । जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणार्या नाशिक विभागातील गावांना राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अमळनेर तालुक्यास विभागस्तरीय द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्या आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या. पुरस्काराचे संपूर्ण श्रेय जलयुक्त शिवार साठी मेहनत व परिश्रम घेणार्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना दिले जाईल असे आमदार वाघ यांनी सांगितले. जलयुक्तच्या कामासाठी शासनाने वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने सतत अवर्षणग्रस्त असलेल्या अमळनेर तालुक्यास मोठा दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार स्मिता वाघ यांनी मुख्यमंत्री, जलसंधारणमंत्री, जलसंपदामंत्री, कृषी मंत्री व शासनाचे विशेष आभार व्यक्त केलेे. यावेळी आयोजित विभागीय आढावा बैठकीत आमदार वाघ यांनी माळन नदी खोलीकरणासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या 11 कोटी निधी बाबत विचारणा केली तसेच अमळनेर तालुका सतत अवर्षणग्रस्त असल्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत वाढीव गावाचा समावेश करण्याची मागणी केली.
ह्या दोन्ही मुद्यावर मा.मंत्री महोदय यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळाले असून लवकरच माळन नदी खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असून पुढील वर्षी अमळनेर तालुक्यातील गावाची संख्या जलयुक्त शिवार अभियानात वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले. पुरस्कार स्किारण्यासाठी जि.प.अध्यक्षा उज्वलताई पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी भटु पाटील आदी
उपस्थित होते.