अमळनेर। अ मळनेर ते राज्यमार्ग 6 (अमळनेर ते फागणे)पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण सद्यस्थितीत 5.5 अस्तित्वात असून ते 15 मीटर प्रस्तावित असून, डांबरीकरण व सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्व बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनात मंजुरी दिली असून यासाठी तब्बल 30 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून अमळनेर ते मंगरूळपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण होऊन शहराच्या सौंदर्यात कमालिची भर पडणार आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी माहिती दिली.
अमळनेर महत्वपुर्ण शहरांशी जोडले जाणार
अमळनेर शहराला मुंबई, पुणे, नाशिक, गुजरात आदी महत्वपूर्ण शहरांशी जोडणारा हा मार्ग असल्याने सतत रहदारीचा मार्ग झाला आहे, यामुळे या रसत्याच्या रुंदीकरणासाठी आमदार चौधरी यांनी शासन दरबारी जोमाने प्रयत्न सुरु केले होते. यासाठी अनेकदा मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांची त्यांनी भेट घेऊन या रस्त्याचे महत्व पटवून दिल्याने मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन मार्च च्या बजेट मध्ये याचा समावेश झाला व या पावसाळी अधिवेशनात या कामाला मंजुरी मिळाल्याची माहिती आ चौधरी यांनी दिली
लवकरच या कामाची प्रशासकीय मान्यता व कार्यारभ आदेश निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी हे देखील या कामांकडे लक्ष वेधून होते. दरम्यान या कामाच्या मंजुरी मुळे अमळनेर शहराची आर्थिक विकासाची गती दुपटीने वाढणार असून आमदार शिरीष चौधरी यांचे नागरीकांनी आभार मानले आहे.
रस्त्याचे बदलणार रंगरूप
सदर कामासंदर्भात बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की अमळनेर शहरातील बोरी पुलापासून नवल नगर पर्यंत 19 किमी च्या लांबीत रस्त्याची सुधारणा, रुंदीकरण व डांबरी करण करण्यात येईल. या सोबत जानवे, मंगरूळ गावात रस्त्यावर दुभाजक, पथदिवे, फुटपाथ व सायकल ट्रॅक टाकून सुशोभीकरण केले जाईल तसेच गटारी व मोर्यांवर स्लॅब टाकला जाईल. याव्यतिरिक्त बोरी पूल ते मंगरूळ एमआयडीसीपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करून रस्त्यालगत फुटपाथ, सायकल ट्रॅक, पथदिवे यासह आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण केले जाईल यामुळे रस्त्याच्या व शहराच्या सौंदर्यात कमालीची भर पडून शहरात प्रवेश करताना हायटेक शहरात प्रवेश होत असल्याचा अनुभव प्रत्येकास येईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.