काँग्रेस-राष्ट्रवादीचेही भाजपासमोर राहणार आव्हान
मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादामुळे गोंधळ
चेतन साखरे, जळगाव: निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणारा मतदारसंघ म्हणजे अमळनेर. या मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून अपक्ष आमदारांनी प्रतिनीधीत्व केले आहे. सन 2009च्या निवडणुकीत सध्या भाजपात असलेल्या माजी आ. साहेबराव कृषीभूषण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढुन आमदारकी मिळविली होती. त्यानंतर सन 2014 मध्ये बाहुबली समजले जाणारे शिरीष चौधरी यांनी पुर्वाश्रमीच्या भाजपात असलेल्या (सध्या राष्ट्रवादीत) अनिल भाईदास पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. सन 2014 मध्ये ही निवडणुक अर्थकारणामुळे चांगलीच गाजली होती. यावेळी देखिल अपक्ष असलेले परंतु मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणार्या आमदार शिरीष चौधरींसमोर आता केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचीच कसोटी पणाला लागणार आहे.
अमळनेर मतदारसंघ हा मोठा चमत्कारीक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे राजकारण नेहमीच बदलते राहीले आहे. अमळनेर मतदारसंघ हा पुर्वी भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. साथी गुलाबराव पाटील यांच्यानंतर या मतदारसंघातुन भाजपाकडुन डॉ. बी.एस.पाटील यांनी सलग तीन वेळा विधानसभेत नेतृत्व केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य माजी आ. कृषीभूषण साहेबराव पाटील हे निवडुन आले. आणि गत 2014च्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबारहुन आलेल्या शिरीष चौधरींनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिध्द केले. सद्यस्थितीला त्यांची या मतदारसंघात ताकद वाढली आहे. मागील काळात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांच्या पॅनलला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनिल भाईदास पाटील यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातुन सत्ता मिळविली. त्यांना भाजपासह इतरांचा छुपा पाठींबा देखिल होता. मात्र शहर विकास आघाडीच्या 22 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याने हे बळ आता कमी झाले आहे. अमळनेर मतदारसंघात 2 लाख 92 हजार 969 मतदार असुन त्यात 1 लाख 51 हजार 990 पुरूष तर 1 लाख 40 हजार 972 स्त्री आणि इतर 7 मतदार आहे. मराठा समाजाचे प्राबल्य असतांनाही तेली चौधरी समाजाच्या हाती या मतदारसंघाची धुरा आहे.
अंतर्गत गटबाजीमुळे भाजपासमोर पेच
अमळनेर मतदार संघातुन विधानपरिषदेवर स्मिता वाघ ह्या प्रतिनीधीत्व करीत असल्या तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने आयोजीत मेळाव्यात झालेल्या ‘दे दणादण’मुळे भाजपात मोठी गटबाजी निर्माण झाली आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा फटका यावेळच्या निवडणुकीतही बसण्याची दाट शक्यता आहे. नुकतेच भाजपाचे मंत्री मदन येरावार यांनी जळगाव दौरा केला होता. या दौर्यात अमळनेर मतदारसंघातील आपलेच भाजपाचे लोक काँग्रेसच्या लोकांना पदे वाटत असल्याचा आरोप वाघांवर करण्यात आला होता. या आरोपामुळे ही गटबाजी उघड झाली आहे.
भाजपात इच्छुकांची फौज
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची मोठी फौज आहे. त्यात नुकतेच भाजपात प्रवेश केलेले सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव हिम्मतराव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, स्मिता वाघ, पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील, माजी आ. डॉ. बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी हे इच्छुक आहेत. इच्छुकांच्या या भाऊगर्दीमुळे भाजपाची या मतदारसंघात कसोटी लागणार आहे. तर राष्ट्रवादीकडुन जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील व संचालिका तिलोत्तमा पाटील आणि काँग्रेसकडुन अॅड. ललिता पाटील हे इच्छुक आहेत.
धरणभोवती फिरते राजकारण
अमळनेर मतदारसंघात पाडळसरे धरणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबीत आहे. धरणाभोवतीच या मतदारसंघाचे राजकारण फिरत राहीले आहे. मात्र या धरणासाठी विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी 2356 कोटी रूपयांचा निधी खेचुन आणला आहे. तसेच रस्ते, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन केलेली कामे ही विद्यमान आमदारांसाठी जमेच्या बाजू ठरणार्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला संभ्रम
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नुकतीच अमळनेरात येऊन गेली. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यासोबत अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि स्मिता वाघ या वाहनावर दिसून आल्या. यावेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि स्मिता वाघ यांच्यासाठी आशिर्वाद मागून राजकीय गोंधळ उडवुन दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेने मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे.
मागी निवडणुकीत मिळालेली मते
शिरीषदादा चौधरी (अपक्ष) 68149
अनिल भाईदास पाटील (भाजपा) 46910
कृषीभूषण साहेबराव पाटील (राष्ट्रवादी) 43667
अनिल अंबर पाटील (शिवसेना) 2879
गिरीश सोनजी पाटील (काँग्रेस) 1458