अमळनेर । येथील उपविभागीय ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय मंगळवार 20 रोजी सकाळी कर्मचारी नसल्यामुळे शुकशुकाट दिसून आला. येथे कार्यरत असलेले 11 कर्मचार्यांपैकी फक्त 2 कर्मचारी वेळेवर हजर होते. काही उशिरा आले तर काहींच्या रजा टाकलेल्या आढळल्या. त्यामुळे कार्यालयीन प्रमुख कार्यालयात नसल्याने कर्मचारीही मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून आले. याबाबत विविध कर्मचार्यांना संपर्क साधुन विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली असून या कर्मचार्यांचा मनमानी कारभाराबाबत अनेक नागरीकांची ओरड होत आहे.
11 लोकांपैकी फक्त 2 कर्मचारी कार्यालयात हजर
येथील जि.प. उपविभागीय ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयातील उपविभागीय अभियंता डी.जी. तांबोळी हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांच्या जागेवर एच.बी. चव्हाण हे तात्पुरता पदभार स्विकारला आहे. मंगळवार 20 जून रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कार्यालयात जावून पाहणी केली असता कार्यालयात कार्यरत असलेले 11 लोकांपैकी फक्त 2 कर्मचारी कार्यालयात दिसून आले. त्यात किरण बागुल शिपाई व डी.बी. पाटील क्लर्क हे सकाळी 11.30 वाजता कार्यालयात हजर होते, तर बी.एन. पाटील व आर.जे. सोनवणे शिपाई यांनी रजा टाकलेली होती.
आस्थापनाच्या वरिष्ठ सहाय्यक श्रीमती यु.आर. भंडारी ह्या सकाळी एक ते दीड तास उशिरा कार्यालयात पोहचल्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी गाडी पंचर झाली होती. मी दवाखान्यात गेली होती असे उडवाउडवीचे उत्तर दिले, त्या कार्यालयात नेहमीच उशिरा येत असल्याची ओरड आहे. तर कनिष्ठ अभियंता श्रीमती नाद्रे ह्या गेल्या महिन्याभरापासून प्रसूती रजेवर आहेत तर कनिष्ठ सहायक श्रीमती के.एस.चौधरी ह्या नाशिक येथे महिला तक्रार निवारणाच्या बैठकीसाठी नाशिक येथे गेले असल्याचे सांगितले. तर उपविभागीय अभियंता डी.जी.तांबोळी हे वैदयकिय रजेवर असून त्यांचा पदभार हे शाखा अभियंता एच.बी.चव्हाण यांच्याकडे आहे. याबाबत त्यांना संपर्क साधला असता मी निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या कामासाठी नगाव खुर्द याठिकाणी असून असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तर चारही अभियंता हे कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामीण भागात भेटी देण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले.
नोंदवहीत कुठलीही नोंद नाही
याबाबत कार्यालयीन हालचाल नोंदवही बघितली असता त्याठिकाणी मंगळवारी 20 जून रोजीच्या कोणत्याच कर्मचार्यांच्या नोंदी हालचाल नोंदवहीत दिसून आल्या नाहीत. यावरून असे दिसून येते की, कार्यालयीन प्रमुख जर कार्यालयात उपस्थित नसतील तर कर्मचारी मनमानी कारभार करतात आणि त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.
शासकीय कार्यालयातील 11 पैकी 9 कर्मचारी कार्यालयात उशिरा पोहचणे हि एक लजास्पद बाब असून ह्याबाबतीत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
– सुंनदा नरवाडे, मुख्य कार्यकारी अभियंता, जि.प. जळगाव