अमळनेर येथे कुत्र्यांच्या तावडीत सापडले काळविट

0

अमळनेर। कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या काळविटाच्या एका दोन महिन्याच्या मादी जातीच्या पाडसाची साबीर शेख शफी यांनी सुटका केली. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारासही घटना 13 जून रोजी पहाटे साडे सहाच्या सुमारास गलवाडे रस्त्यावरील श्रद्धानगरमध्ये घडली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी तातडीने उपचार केल्याने पाडसाचे प्राण वाचले आहेत. शेख यांनी जखमी पाडसाला घरी नेऊन त्याची शुश्रूषा केली. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडे स्वाधीन केले. कर्मचार्‍यांनी पाडसाला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी.भोई यांनी उपचार केले.

कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यास किरकोळ जखमा झाल्या असून, त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यावेळी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ.एस.वाय. पाटील, हवालदार सुनील हटकर, अप्पा पाटील, वनपाल वाय.यू. पाटील, वनरक्षक डी.के. जाधव, एस.बी. पाटील, व्ही.बी. माळी, श्री.महिंदळे, पल्लवी सोनवणे, सतीश सोनवणे, अजय पाटील, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते. जखमी पाडसाची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्यास पुन्हा जंगलात सोडून देण्यात येईल, अशी माहिती वनरक्षक जाधव यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वीही असेच भरकटलेले एक पाडस अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे आढळले होते. त्यास युवकांनी जीवदान दिले होते. या पंधरवड्यातील ही दुसरी घटना असून पाण्याच्या शोधातच जंगली श्वापदे मानवी वस्तीकडे येत असल्याने बरेच प्राणी कुत्र्याची शिकार होतात त्यामुळे जंगलात पाण्याची व्यावस्था करण्याची मागणी होत आहे.