अमळनेर विधानसभेसाठी भाजपकडून कोणाला मिळणार तिकिट ?

0

भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडून तिकीट निष्ठावंत कार्यकर्त्यांना की आयत्या वेळी पक्षात आलेल्या आयाराम संधिसाधू ना?

अमळनेर: लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षात येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात काँग्रेस राष्ट्रवादी तसेच अनेक स्थानिक पातळीवरील तसेच पद भूषविलेले पक्षाचे नेतृत्व केलेले लोकप्रतिनिधी आहेत. मात्र या सगळ्या घडामोडीत पक्षाचा कार्यकर्ता भरडला जाणार आहे, अमळनेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल की विधानसभेच्या तोंडावर आयत्या वेळी पक्षात प्रवेश केलेल्या संधीसाधूंना भाजपचे तिकीट मिळेल याकडे तालुक्यासह मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

भारतीय जनता पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेच्या विरोधात काम करत होता त्यावेळी पक्षाच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने पक्ष वाढीसाठी अतोनात प्रयत्न केले. काहींनी पोस्टर चिटकवण्यापासून ते भिंती रंगवण्यापर्यंत दिवसरात्र मेहनत घेऊन पक्ष वाढवला याच पक्षात सत्तेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम केले. कुठलेही प्रलोभने व आमिषाला बळी न पडता आपला इमान जागा ठेवला.आणि आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर त्याच प्रामाणिक व इमानदार कार्यकर्त्यांना डावलून काही संधीसाधूना पक्षाने संधी दिली तर कित्येक दशक पक्षाशी एकनिष्ठ व एकसंघ राहणार्‍या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल व याचेच पडसाद निवडणुकीच्या वेळी मतपेटीतून दिसतील. परिणामी येत्या विधानसभेला या संधी चे सोन न होता ही संधी देखील भारतीय जनता पक्षाला गमवावी लागू शकते. असे असले तरी भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष असून आगामी काळात होणार्‍या निवडणुकांमध्ये पक्षाकडून जो आदेश दिला जाईल त्याचे पालन केले जाईल असा विश्वास देखील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

याउलट राष्ट्रवादी पक्षाकडून भाजप सोडून राष्ट्रवादी वासी झालेले अनिल भाईदास पाटील हे तयारीत असून अपक्ष निवडून आलेले शिरीष चौधरी हे देखील जोरदार तयारी करत असून भाजपची अमळनेर विधानसभा उमेदवार निवडीसाठी दमछाक होताना दिसते आहे.