अमळनेर शहरात गोदाम फोडून 44 हजारांचे साहित्य लांबवले

अमळनेर : बांधकाम साहित्य ठेवलेल्या गोदामातून चोरट्यांनी सुमारे 44 हजारांचे साहित्य लांबवल्याची घटना शहरात उघडकीस आली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
बांधकाम ठेकेदार शब्बीर हुसेन कुतूबुद्दीन (52, रा.सुरभी कॉलनी, अमळनेर) यांचे शहरातील पिंपळे रोडवरील शंकर नगरात बांधकाम साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. बुधवार, 27 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता ते गोदामाला लावून घर गाठले व रात्री चोरट्यांनी संधी साधून बांधकामाचे साहित्य चोरून नेले. तार, लोखंडी प्लेटा, सळईचे तुकडे, अँगलचे तुकडे मिळून एकूण 44 हजारांचा सामान चोरीला गेला. हा प्रकार गुरूवार, 28 एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शब्बीर हुसेन कुतुबुद्दिन यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक कैलास पवार करीत आहे.