अमळनेर । येथील धुळे रस्त्यावरील साने गुरूजी विद्यालयाच्या आवारात असणार्या व्यापारी संकुलाचे शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. धुळे रस्त्यावरील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेली 18 बेकायदेशीर दुकाने पाडण्यास नगरपालिकेने शुक्रवारी सकाळपासून सुरवात केली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तात तैनात असल्यामुळे दुकाने पाडण्याची कामे शांततेत सुरू होती. नगरपालिकेकडून ही कारवाई सुरू असतांना परीसरातील व दुकानदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
न्यायालयाचे होते आदेश
शैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेवर व्यापारी संकुल बांधले म्हणून माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल 26 जुलै 2017 रोजी लागला होता. उच्च न्यायालयाच्या खंडापीठाने आदेशानुसार ही दुकाने एका महिन्याच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात नगरपालिकेने संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या. शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता नगरपरिषदेने चार जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित दुकाने पडण्यास सुरुवात केली. सकाळी-सकाळी सुरू झालेल्या या कारवाईमुळे बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती. सकाळी पोलीस येण्यापूर्वीच पालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली होती.
मुख्याधिकार्यांसह अधिकार्यांची उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुटे यांच्यासह संजय चौधरी, बांधकाम अभियंता प्रवीण जोंधळे, संजय पाटील, युवराज चव्हाण, संतोष बिजहाडे, दिलीप सारजे, शेखर देशमुख, महेश जोशी, अविनाश संदनशिव, ज्ञानेश्वर संदनशिव, प्रसाद शर्मा, पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक ढोबळे, उपनिरीक्षक सुरेश मोर, डॉ. विलास महाजन आदी अधिकारी उपस्थित होते. याशिवाय अग्निशामक दल रुग्णवाहिका, एक आरसीपी प्लाटून, 11 पोलीस दोन महिला पोलीस उपस्थित होते. शांततेत ही कारवाई पार पडली.