अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोघा अभियंत्यांना अटक
अडीच लाखांची लाच मागणी भोवली : सा.बां.वर्तुळात खळबळ
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील आदिवासी वस्तीगृहाच्या बांधकामाचे जुने बिल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोघा अभियंत्यांनी दोन लाख 58 हजारांची लाच मागितली होती मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी निष्पने दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. उपविभागीय अभियंता दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधलीकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपींना अटक केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
लाच मागणी अंगलट
धुळ्यातील तक्रारदार हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत साईट इंजिनिअर आहेत. नंदुरबारच्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीने अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील आदिवासी मुलींच्या वसतिगृह बांधकामाचा ठेका घेतला मात्र हे काम धुळ्यातील तक्रारदाराच्या कंपनीने करारनामा करून घेतले होते. बांधकाम झाल्यानंतर कामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी 8 जून 2021 रोजी दोन लाख 58 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे या संदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. लाच मागणीबाबतचा अहवाल धुळे एसीबीला प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी आरोपींविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीच्या पथकाने दिनेश पाटील यांना धुळ्यातील निवासस्थावरून तर सत्यजीत गांधलीकर यांना अमळनेर येथील कार्यालयातून केली.
यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (रीडर), धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुर्हाडे, निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंग चव्हाण, जयंत साळवे, कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरूषोत्तम सोनवणे, संदीप कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, महेश मोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील आदींच्या पथकाने केली.