अनेक आघाड्यांवर पाकचा खोटारडेपणा उघड होत असतांना हा देश उलट्या बोंबा ठोकण्याची आपली प्रवृत्ती सोडण्यात तयार नसल्याचे आता पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना दिलेल्या वागणुकीतून या देशाचा अमानवीपणाचा चेहरा उघड झाला आहे. यातच देशातील काही राजकारण्यांच्या बेताल बडबडीने बुध्दीभेद करण्याच्या नापाक रणनितीला बळ मिळाले असले तरी संसेदत एकजुटीने याचा निषेध करण्यात आला ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब होय.
भारत व पाक संबंधांचा विचार करता ‘कुत्र्याचे शेपूट’ या वाक्प्रचाराचा वारंवार वापर केला जातो. यात तथ्यदेखील आहेच. भारताशी समोरासमोरच्या युध्दात विजय मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर या देशाने सातत्याने दुटप्पीपणाची भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कथित दहशतवादविरोधी जागतिक युध्दात हिरीरीने सहभागी होण्याचा आव आणणारा पाकिस्तान हाच दहशतवादाचा निर्माता असल्याची बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. खरं तर, अमेरिका आणि चीन हे देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी भारताच्या प्रभावाला रोखण्यासाठी त्यांनी पाकला वेळोवेळी गोंजारण्याची निती आखली असून याचा तेथील राज्यकर्ते कुशलपणे उपयोग करून घेत आहेत. या पार्श्वभूमिवर, अलीकडच्या कालखंडातील भारत व पाकच्या संबंधांचा विचार केला असता एकाच वेळी अनेक घटनांचा पट उलगडत जातो. काही दिवसांपूर्वी भारतीय जवानांनी पाकच्या हद्दीत जाऊन आपल्या सहकार्यांच्या हौतात्म्याचा बदला घेतला. पाकने यात आपले तीन सैनिक ठार झाल्यास दुजोरा दिला असला तरी भारतीय सैन्याने पाकची हद्द ओलांडलीच नसल्याचा आव आणला आहे. यातच कुलभूषण जाधव या पाकच्या ताब्यात असणार्या भारतीय नागरिकाला त्यांची आई व पत्नीला भेट घेऊ दिली असली तरी यात या देशाचे वर्तन अत्यंत असभ्यपणाचे असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पाकची कुख्यात आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा पंजाबमध्ये खलीस्तान चळवळीला पुनरूज्जीवीत करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. या सर्व घटनांमधून पाकचा दुटप्पीपणा, उलट्या बोंबा ठोकण्याची प्रवृत्ती आणि अर्थातच भारतात अशांतता फैलविण्याचे कारस्थान उघड झाले आहे. या सर्व घटनांमध्ये जाधव कुटुंबियांच्या भेटीत पाकचे वर्तन हे दोन्ही देशांमधील तणावाला वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते.
कुलभूषण जाधव हे व्यावसायिक असले तरी त्यांना गुप्तहेर म्हणून पाकने अटक केली आहे. जाधव यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून हेर असल्याबद्दलची वक्तव्ये वदविण्यात आलेले व्हिडीओ आधीदेखील जारी करण्यात आले होते. आता आई आणि पत्नीला भेटल्यानंतर पाकचे कथित आभार मानतांनाच्या व्हिडीओत जाधव हे पुन्हा एकदा आपण ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेचे सदस्य असल्याचा पुनरूच्चार करत असून हा सर्व प्रकार संशयास्पद असाच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्यासाठी पाक जाधव यांना वापर करत आहे. खरं तर त्यांना फासावर लटकवण्याची तयारी कधीच करण्यात आली होती. तथापि, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे तूर्तास याला स्थगिती देण्यात आली आहे. जाधव कुटुंबियांची भेट ही शेवटची नसल्याची मखलाशी करणार्या पाकची अधम प्रवृत्ती लागलीच उघड झाली आहे. यात त्यांची आई व पत्नीला मराठीतून बोलू न देणे, त्यांचा धार्मिक अपमान करणे आदी बाबी तर लागलीच उघड झाल्या. यातच पाक मीडियाचा रानटीपणाही दिसून आला. पाकमधील क्रिकेटपटू आणि कलावंतांना भारतात अतिशय सन्मान मिळत असतांना तेथील मीडियाने घेतलेली ही भूमिका निषेधार्ह अशीच आहे. यातच आता पाकने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीने आपल्या बुटात हेरगिरी करणारे यंत्र ठेवले असल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. त्यांचे बूट फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहितीदेखील लागलीच प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. यामुळे भेटीसाठी मानवतेचे नाटक करणार्या पाकने याच भेटीचा भारताच्या बदनामीसाठी पध्दतशीरपणे उपयोग केल्याचे दिसून येत आहे.
कुलभूषण जाधव यांच्या भेटीच्या प्रकरणावरून देशातील प्रमुख राजकारण्यांनी अत्यंत संयमीत वक्तव्ये केल्याची बाब त्यातल्या त्यात समाधानाची आहे. समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे सदस्य नरेश अग्रवाल यांनी बेताल बडबड करत कुलभूषण जाधव यांना दहशतवादी ठरवून टाकत पाकच्या त्यांच्यासोबतच्या वर्तनाला योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने थोडी खळबळ उडाली. मात्र परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाकचा दुटप्पीपणा उघडकीस आणला. पाकच्या विमानतळावरील तपासणीत जर बुटात काही आढळले नाही ते ते जप्त करण्याची गरज काय? असा प्रश्न विचारत त्यांनी या कृत्याचा निषेध केला. तर काँग्रेससह अन्य पक्षांनीही या प्रकरणी एकजुटीचे दर्शन घडवत पाकला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पाकच्या आयएसआयने खलीस्तान चळवळीला बळ देण्याचा कट आखल्याची माहिती राज्यसभेत सरकारतर्फे देण्यात आली असून यादेखील अतिशय चिंतेचा विषय आहे. खर तर खलीस्तानवादी दहशतवाद संपुष्टात येऊन अनेक वर्षे झाली असली तरी एक घटक मात्र यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेत असल्याचे अधून-मधून दिसून येत आहे. याच प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा पाकचा मनसुबा असल्याचे आता अधोरेखित झाले आहे. याकडे आपण अत्यंत गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारताला अनेक आघाड्यांवर नामोहरम करण्यासाठी पाकचा आटापीटा अधोरेखित झाला आहे. याला त्याच्याच शब्दात उत्तर देण्याची आवश्यकता आता येऊन ठेपली आहे. असे न झाल्यास कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहणार यात शंकाच नाही.