अमिताभ यांचे ट्विटरला रामराम करण्याचे संकेत

0

मुंबई । बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरला रामराम करण्याचे संकेत दिले आहेत. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी ट्वीट करुन, याबाबतची माहिती दिली. या ट्वीटमधून त्यांनी कंपनीने आपले फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप केला आहे. अमिता बच्चन यांनी बुधवारी रात्री 11.35 वाजण्याच्या सुमारास हे ट्वीट केले असून, यात त्यांनी म्हटले की, ट्विटरने माझे फॉलोअर्स कमी केले आहेत? हा एक विनोद वाटत आहे. त्यामुळे वेळ आली आहे की, ट्विटरला रामराम केला पाहिजे. आतापर्यंतच्या प्रवासासाठी सर्वांचा आभारी आहे.

पंतप्रधानांनंतर अमिताभ सर्वाधिक फॉलोअर्स
या ट्वीटमध्ये त्यांनी इतर सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मचाही उल्लेख करुन म्हटले की, या विशाल समुद्रात अनेक मासे आहेत, आणि काही त्यातही अतिशय रंजक आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनंतर अमिताभ बच्चन यांना देशातील सर्वाधिक ट्विटर यूजर्स फॉलो केले जाते. पण बुधवारच्या आकडेवारीनंतर अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी शाहरुख खानने दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर अमिताभ बच्चन यांची तिसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्या शाहरुख खानचे 3 कोटी 29 लाख 35 हजार 562 ट्विटर फॉलोअर्स आहेत. तर अमिताभ बच्चन यांचे 3 कोटी 28 लाख 99 हजार 787 फॉलोअर्स आहेत.