रायबरेली : उंचाहार येथील एका प्रचारसभेत बोलताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलश यादव यांचा तोल गेला. अखिलेश यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांना सल्ला देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सध्या एका गाढवाची जाहीरात दिसत आहे. यासंदर्भात मी या शतकातील सर्वात मोठ्या महानायकाला सांगेन की, तुम्ही गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नका. अखिलेश यांनी ही टीका केली कारण, अमिताभ हे गुजरात पर्यटन विभागाचे अॅम्बॅसेडर असून गुजरात पर्यटन विभागाच्या नव्या जाहीरातीमध्ये अमिताभ यांच्याबरोबर अनेक गाढवांना दाखविण्यात आले आहे.
मोदींनी गंगेची शपथ घ्यावी
रविवारी फतेहपुर येथील प्रचारसभेत अखिलेश यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करताना मोदी म्हणाले होते की, उत्तर प्रदेश सरकार जर रमजान महिन्यात वीज पुरवते तर दिवाळीतही वीज देणे सरकारचे काम आहे. या आरोपाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, मोदी गंगेला पुज्य मानतात. मी त्यांना सांगतो की त्यांनी गंगेची शपथ घेवून सांगावे की, वाराणसीला चोवीसतास वीज मिळते किंवा नाही. अखिलेश म्हणाले, दिवाळी आणि रमजानचे नंतर पाहू प्रथम काशीबद्दल बोलू. कारण वाराणसी मोदींचा मतदारसंघ आहे.
काम की बात कधी
युपीचा मी दत्तकपुत्र आहे असे विधान मोदी यांनी केले होते. यावर अखिलेश म्हणाले, पंतप्रधानांना काशीने निवडूण पाठवले आहे. ते बनारसला जातात तेव्हा म्हणतात, गंगा मातेने मला बोलावले आहे. आणि येथे आल्यावर म्हणतात की युपीने मला दत्तक घेतले आहे. पंतप्रधानांनी मन की बात आता बंद करून महत्वाच्या बाबींवर लक्ष दिले पाहिजे. आम्ही अनेकदा त्यांची मन की बात ऐकली आहे. आता मोदी काम की बात कधी करणार.
पुन्हा नोटाबंदीचा उल्लेख
या रॅलीत सुध्दा अखिलेश यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरून मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधानांनी संपुर्ण देशाला रांगेत उभे केले. बॅकांसमोरील रांगेत उभे राहील्याने अनेकांचे जीव गेले. तरीही सरकारला काही वाटले नाही. पंधरा लाख रूपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यात भरण्याचे आश्वासन देणार्या मोदींनी पंधरा हजार तरी द्यावेत. किमान त्यांचे आश्वासन तरी पुर्ण झाल्यासारखे वाटेल.