अहमदाबाद : नरोदा पटिया भागात दंगलीच्यावेळी माया कोडनानी विधानसभेत उपस्थित होत्या. मी स्वत: त्या दिवशी विधानसभेत त्यांना भेटलो होतो, अशी साक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी 2002मधील गुजरात दंगलीच्या संदर्भातील एका खटल्यात दिली. गोध्रा कांडानंतर गुजरातमधील नऊ भागांत मोठ्या दंगली उसळल्या होत्या. नरोदा येथील दंगलीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना 28 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात शहा यांनी सोमवारी साक्ष दिली.
त्यावेळी कोडनानी विधानसभेत होत्या
नरोदा पटिया दंगलप्रकरणी सोमवारी साक्ष देताना अमित शहा न्यायालयात सरकारी वकिलांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, नरोदा येथे दंगल उसळली, तेव्हा कोडनानी विधानसभेत होत्या. तिथे सकाळी साडेआठच्या सुमारास आमची भेट झाली होती. त्यानंतर साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान मी सिव्हील हॉस्पिटलमध्ये होतो. तिथेही कोडनानी मला भेटल्या होत्या. येथून त्या कुठे गेल्या हे माहित नाही, असे शहा यांनी न्यायालयात सांगितले. शहा यांची ही साक्ष कोडनानी यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. शहा यांनी साक्ष देण्यापूर्वी न्यायालयाने त्यांना जबाबदारीने साक्ष द्यावी, असे सुचित केले.
न्यायालयाने बजावले होते समन्स
अमित शहांना साक्षीदार म्हणून बोलावण्याची विनंती कोडनानी यांनी एसआयटीच्या विशेष न्यायालयात केली होती. न्यायालयाने ती विनंती मान्य करून शाह यांच्यासह 14 जणांना एप्रिल महिन्यात समन्स बजावले होते. इतर 13 जणांनी मधल्या काळात न्यायालयात हजेरी लावून साक्ष दिल्या. परंतु, शहा हजर न राहिल्याने न्यायालयाने सोमवारी शेवटची तारीख दिली होती. त्यानुसार शहा न्यायालयात उपस्थित राहिले होते. दंगलीच्यावेळी मी विधानसभेत होते, हे अमित शहा यांना महित आहे, त्यांना साक्षीसाठी बोलवावे अशी विनंती कोडनानी यांनी न्यायालयाला केली होती. याचसंदर्भात अमित शहांना प्रश्न विचारण्यात आले.