अमित शहांचे ‘मिशन 350 प्लस’

0

नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2019 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन 350 प्लस’ ही मोहिम आखली असून या अनुषंगाने गुरूवारी दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिथे भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असे शहा यांनी बैठकीत म्हटले. या जागांसाठी त्यांनी सादरीकरणही केले. या बैठकीत एकूण 31 नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. विविध राज्यातील काही नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. पक्षाकडून मंत्र्यांना अनेक जबाबदार दिल्या होत्या. यामध्ये दलितांच्या घरी जेवणाचाही समावेश होता. या सर्व कार्यक्रमांबाबत माहिती घेण्यात आली. बैठकीत पुढील लोकसभा निवडणुकीत 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी बैठकीत अनंत कुमार, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिह तोमर, जे.पी.नड्डा, पीयूष गोयल, धर्मेंद प्रधान, निर्मला सीतारमण, मनोज सिन्हा, प्रकाश जावडेकर आणि अर्जुन मेघवाल आदी नेते सहभागी झाले होते. अमित शहा यांनी सर्व मंत्री आणि नेत्यांकडून मतदारसंघांविषयी माहिती जाणून घेतली.

प्रेझेंटेशनमधून माहिती
ज्या ठिकाणी गत निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. अशा मतदारसंघांसदर्भातील एका प्रेझेंटेशनही आजच्या बैठकीत सादर करण्यात आले. तसेच येत्या दोन वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये नेत्यांनी मेहनत घेतली पाहिजे, असे अमित शाह यांनी नेत्यांना सांगितले. या प्रेझेंटेशनमध्ये पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील जागांचा उल्लेख करण्यात आल्याचे वृत्त आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील असलेले अमित शाह या राज्यांमधील भाजपाची कामगिरी सुधारू इच्छित आहेत. त्यामुळे या राज्यांमधील मतदार संघांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.