मुंबई । माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत 27 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याला राणे वा भाजपच्या सुत्रांनी दुजोरा दिला नसला तरी हा मुहूर्त टळणार नसल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.
शहांच्या मुंबई दौर्याची प्रतीक्षा
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या कधीपासूनच उठत आहेत. मात्र अनेकदा याला हुलकावणी मिळाली आहे. या पार्श्वभूमिवर अमित शहा यांच्या 27 रोजीच्या नियोजीत दौर्यात ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. मात्र यावर खुद्द राणे यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
घुसमटीला कंटाळले
हे देखील वाचा
शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नारायण राणे यांना पक्षाने अनेकदा मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना महसूलमंत्रीपद मिळाले. यानंतर तर त्यांचे महत्व जाणीवपूर्वक कमी करण्यात आले. यामुळे ते अस्वस्थ होते. यातच आता काँग्रेसच्या आगामी वाटचालीबाबत संभ्रम असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
केंद्रात जाणार ?
नारायण राणे यांचा 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर मुंबईतल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकिट दिले तरी त्यांना अपयश आले. अर्थात पक्षाने त्यांनी विधानपरिषदेत घेतले असले तरी त्यांनी सभागृहात अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमिवर राज्यसभेच्या मार्गाने संसदेत जात त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपचा एक गट नाराज
नारायण राणे युती सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री आणि नंतर अल्प काळ मुख्यमंत्री असल्याने त्यांचे भाजपमधील अनेक नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. यातच त्यांच्या आगमनामुळे कोकणात भाजप बळकट होणार आहे. मात्र त्यांच्या आगमनामुळे भाजपमधील काही नेते अस्वस्थ असल्याने त्यांचा पक्षात प्रवेश होत नसल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. विशेष करून त्यांचा महत्वाकांक्षी स्वभाव पाहता काही नेते त्यांच्या संभाव्य प्रवेशाला विरोध करत असल्याची कुजबुज सुरू असतांना आता मात्र अमित शहांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये दाखल होणार आहे.