अमित शाह यांचे ‘मिशन 2019’

0

नवी दिल्ली : 2019 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तयारीकडे लक्ष देण्यासाठी पक्षाकडून विशेष टीमची नियुक्ती केली जाणार आहे. या टीममध्ये एका पूर्णवेळ कार्यकर्त्यासह निरीक्षकांचा समावेश असेल. अमित शहा स्वत: प्रत्येक राज्यात भेट देऊन तेथील बुथ स्तरावरच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी अमित शहा प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 15 दिवस मुक्काम करणार आहेत.

भाजपच्या दीनदयाळ विस्तार योजनेतंर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अभियानाचा भाग म्हणून आजपासून अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौर्‍याची सुरूवात झाली आहे. यानंतर ते आणखी चार राज्यांना भेटी देणार आहेत. हे कार्यकर्ते 2019 लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडेपर्यंत आपापल्या मतदारसंघात कार्यरत असतील. पक्षाकडून विविध लोकसभा मतदारसंघात तब्बल 600 पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल साडेतीन लाख कार्यकर्त्यांमधून या 600 कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. हे पूर्णवेळ कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक बुथवर साधारण 15 दिवस काम करतील. याशिवाय, अन्य चार हजार कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांसाठी पक्षाचे काम करण्याची तयारी दाखविली आहे.

अमित शहा स्वत: या सगळ्यावर नजर ठेवणार आहेत. तर गुजरात, ओदिशा, तेलंगणा, लक्षद्वीप आणि पश्‍चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये तर ते बुथ स्तरावरील निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन करतील. या सगळ्या तयारीची पाहणी करण्यासाठी अमित शहा पुढील तीन महिने देशभरात दौरा करणार आहेत. या दौर्‍यात अमित शाह 120 लोकसभा क्षेत्रांसाठी विशेष रणनीती आखणार आहेत. याशिवाय, ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे, मात्र प्रयत्न केल्यास पक्षाला त्याठिकाणी यश मिळू शकते, अशा लोकसभा क्षेत्रांचीही यादी अमित शाह यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात येईल.