अहमदाबाद । अमूल दूध, अमूल बटर, अमूल चीज, अमूल श्रीखंड या पदार्थांना आपल्या रोजच्या जगण्यात किती ‘अमूल्य’ स्थान आहे, हे सर्वसामान्य व्यक्तींना माहित आहे. आपल्या पौष्टिक आणि चवदार डेअरी उत्पादनामुळे घराघरांत जाऊन बसलेले अमूल आता खवय्यांसाठी चमचमीत, चटपटीत, खमंग खाऊ घेऊन येतेय. अमूलचे समोसे, पराठे, पॅटीस लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. लेह-लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि जैसलमेरपासून शिलाँगपर्यंत अमूलचे 66 डेपो आणि 2 लाख आउटलेट आहेत. म्हणजेच, अमूलने देशात आपले स्थान निर्माण केले आहे. कोट्यवधी लोकांपर्यंत कंपनी पोहोचली आहे, त्यांना आमची उत्पादने पसंत पडत आहेत, म्हणूनच फ्रोजन स्नॅक्सच्या बाजारातही पाऊल टाकायचं आम्ही ठरवलं आहे, अशी माहिती गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोधी यांनी दिली.
दोन वर्षांत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
पनीर पराठा, पॅटीस, समोसा यासारखे सात-आठ प्रकारचे पदार्थ पुढच्या दोन आठवड्यात ते बाजारात आणणार आहेत. भविष्यात लोकांचा प्रतिसाद पाहून पदार्थांची संख्या आणखी वाढवली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले. अमूल कंपनीच्या विस्तारासाठी पुढच्या दोन वर्षांत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून लवकरच कोलकाता आणि वाशी इथं डेअरी प्रकल्प सुरू केला जाणार आहे. तर वाराणसीतही भव्य प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचं सोधी म्हणाले.