अमृतचेतना प्रकल्प ठरतोय वरदान

0

गुणवत्ता वाढीस लावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

पिंपरी : आर्थिकदृष्ट्या मागास आणि झोपडपट्टी भागात राहणारे विद्यार्थी ठराविक कालावधीनंतर शिक्षण सोडतात. बहुतांश वेळेला या भागातील मुले शाळेतच जात नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती वाढते आहे. ही विद्यार्थी गळती कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची आवड वाढविण्यासाठी माता अमृतानंदमयी मठ, निगडी यांच्यावतीने ‘अमृतचेतना’ हा प्रकल्प राबविला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर शाळा, अजंठा नगर येथे दर रविवारी हा प्रकल्प मागील दहा वर्षांपासून अविरत सुरु आहे.

विविध उपक्रमस
अजंठा नगर परिसरातील शाळेत न जाणारे झोपडपट्टी भागात राहणारे तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले विद्यार्थी शोधून त्यांना शाळेची वाट दाखविण्यात येते. तसेच नियमित शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या प्रकल्पांतर्गत शालेय अभ्यासक्रमाबरोबर शुद्धलेखन हस्तकला, इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणि संगणक हे तीन विशेष वर्ग चालविले जात आहेत. पाचवी ते सातवीच्या वर्गातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी दीड हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत दरवर्षी देण्यात येते. या योजनेअंतर्गत आजवर सुमारे 90 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

वाचनाची आवड वाढते आहे
अजंठा नगर भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीसाठी खाजगी शिकवणी लावण्याकरिता देखील मदत केली जाते. विद्यार्थ्यांसाठी शाळेत ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकार आणि विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड जोपासली जात आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुण वाढीला लावण्यासाठी अन्य विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये पर्यावरण सहल, विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. या प्रकल्पामुळे शाळेची गोडी लागलेले विद्यार्थी आज विविध अभ्यासक्रमांमधून शिक्षण घेत आहेत.

कौशल्य विकास उपक्रमही राबवितात
माता रमाबाई आंबेडकर शाळेची माजी विद्यार्थीनी ऐश्‍वर्या उत्तम वीर म्हणाली की, अमृतचेतना प्रकल्पामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबर अन्य कौशल्य विकास उपक्रमांचे देखील आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. व्यक्तिमत्व विकास होण्यास देखील फार मोठी या प्रकल्पाची व घेण्यात येणा-या विविध उपक्रमांची मदत होते. शालेय जीवनात हस्तकला, रांगोळी किंवा अन्य कौशल्ये आत्मसात झाल्यामुळे महाविद्यालयीन जीवनात याचा उपयोग होतो. मी बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले असून सध्या एमबीबीएसला प्रवेश मिळविण्यासाठी तयारी करते आहे. माता अमृतानंदमयी मठ, निगडीचे महिंद्रा भगत, उमेश कुटे, कृष्णा पिल्ले, सुरेश रुपनर यांच्या संयोजनात सुधीर तिरुमणी, जसीत गोपालकृष्णन, किरण वत्स, पद्मजा होनकलस, सीमा गव्हाणे, शारदा बांद्रे आदी ‘अमृतचेतना’ प्रकल्पाअंतर्गत वर्ग चालवितात.