अमृतच्या कामाला अधिकाऱ्यांच्या हफ्तेवसुलीमुळे अडथळा !

0

मनपा विरोधीपक्षनेते सुनिल महाजनांचा धक्कादायक आरोप

जळगाव: शहरात अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात मनपा अभियंता व अधिकाऱ्यांची ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी केला आहे. शहरात अतिक्रमण वाढले असून कारवाई टाळण्यासाठी मनपा कर्मचारी हप्तेवसुली करत असल्याचा खळबळजनक आरोपही सुनिल महाजन यांनी केला आहे.

सोमवारी १३ रोजी सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आरोप केले. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते. अमृत योजनेच्या कामांमध्ये मनपाच्या अधिकारी व अभियंत्यांनी टक्केवारीची मागणी केल्याने ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सध्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंदगतीने सुरु असल्याची माहिती यावेळी सुनिल महाजन यांनी दिली.

अन्यथा सेनेची स्टाईल दाखवू
सत्ताधारी व मनपा प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत. तर २३ मे नंतर शिवसेना आपल्य स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा महाजन यांनी दिला. तसेच शिवसेनेची बांधिलकी ही जनतेशी असून, मित्रपक्षाशी नसल्याचाही टोला महाजन यांनी लगावला आहे.

ठेका देण्यामागे आर्थिक हित
मनपा प्रशासनाने शहरातील एकमुस्त सफाईचा ठेका वॉटरग्रेस या कंपनीला देण्याची तयारी सुरु केली असून, या कंपनीचा खामगाव येथील मक्ता नगरपरिषदेने रद्द केला असल्याची माहिती महाजन यांनी दिली. मनपातील काही पदाधिकाऱ्यांचा आर्थिक फायद्यासाठी हा ठेका वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती देखील महाजन यांनी दिली. तसेच हा ठेका देताना आरोग्य विभागाने सर्व अटी व नियमांना डावलले असल्याचेही महाजन सांगितले.

सत्ताधाऱ्यांचे प्रशासनावर नियंत्र नाही
शहरात १६ हजार एलईडी बसविण्यासाठी तब्बल साडेसात कोटी रुपयांची निविदा काढून ठेका देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत ज्या भागांमध्ये एलईडी बसविण्यात आले आहेत. त्या भागात हे पथदिवे बसविल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच हे पथदिवे बंद पडले असल्याची माहिती विरोधी पक्षनेत्यांनी दिली. शहरात एकीकडे कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, अनेक भागांमध्ये घंटागाड्या पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाने घेतलेल्या ८५ घंटागाड्या महिनाभरापासून मनपाच्या आवारात धुळ खात पडलेल्या आहेत. यावरुन सत्ताधाऱ्यांचे मनपा प्रशासनावर कुठलेही नियंत्रण आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केले.