अमृतसरमध्ये आंदोलनकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक; तणावाचे वातावरण

0

अमृतसर : अमृतसरच्या जोडा फाटकजवळ रावण दहनाच्यावेळी झालेल्या भीषण अपघातात 61 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्त्या नागरिकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली आहे. रविवारी पंजाब पोलिसांचं पथक रेल्वे रुळांवर आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यासाठी गेलं असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पंजाब पोलिसांचा एक जवान आणि एक पत्रकार जखमी झाला आहे. दरम्यान,या ठिकाणाहून आंदोलनकर्त्यांना हटवण्यात आलं असून अपघातानंतर या मार्गावरुन पहिली रेल्वे रवाना झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सकाळपासून जोडा फाटकजवळ मृतांचे नातेवाईक आणि नागरिक आंदोलन करत होते. त्यावेळी स्थानिक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना तेथून हटवलं आहे. बंदोबस्तासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक तेथे मागवण्यात आली आहे. दगडफेकीत पंजाब पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल अमृतपाल सिंह गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.