अमृतांजन पुलाला नागरिकांचे अभय

0

लोणावळा । महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 187 वर्षे जुन्या पुलाला पाडण्याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवल्या होत्या. यामध्ये सुमारे 80 टक्के नागरिकांनी हा पूल पाडू नये अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे एमएसआरडीसी समोर अडचण निर्माण झाली आहे.धोकादायक झालेला अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोणावळा ते खंडाळा या दरम्यान एक्स्प्रेस हायवेला जोडणारा हा पूल धोकादायक झाला आहे. मात्र, पूल पाडण्यापूर्वी ‘एमएसआरडीसी’ने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. आतापर्यंत 40 हरकती आणि सूचना आल्या असून, त्यामध्ये सुमारे 80 टक्के हरकती आणि सूचना पूल पाडू नये, या बाजूच्या आहेत. दरम्यान, हा पूल आपल्या जागेत असल्याची नोटीस एका व्यक्तीने बजावल्याने, जागामालक संबंधित व्यक्ती आहे का, या संदर्भात सविस्तर अहवाल देण्याची मागणी ‘एमएसआरडीसी’ने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडे केली आहे.

नवा पूल बांधण्याचा प्रस्ताव
लोणावळा येथील अमृतांजन पूल 1830 मध्ये ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ह्यूज यांनी एका वर्षात बांधला होता. त्यांनीच लोणावळा-खंडाळा घाटातील रेल्वे मार्गदेखील उभारला होता. या पुलावर पूर्वी ’अमृतांजन बाम’ची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे या पुलाला अमृतांजन पूल असे नाव पडले आणि तेच पुढे प्रचलित झाले. मात्र वाढत्या अपघातांची संख्या, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे व पुलाचे जुने बांधकाम पाहता हा जुना पूल पाडून, नवा पूल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे. मात्र, नागरिकांकडून मागविण्यात आलेल्या सूचना आणि हरकतीमध्ये 30 ते 40 नागरिक व संस्थांनी सूचना पाठविल्या आहेत. त्यामध्ये 80 टक्के लोकांनी पूल पाडू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे याचा निर्णय काय होईल हे सविस्तर अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.