अमृत योजनेतून नवसंजीवनी

0

भुसावळ। गेल्या पालिका निवडणूकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार अमृत योजनेसाठी पाठपुरावा करुन अखेर 90 कोटी 84 लाख 51 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेतून शहराला नवसंजीवनी मिळणार असून शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून या अभियानांतर्गत पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, नागरि परिवहन व हरितक्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरात करण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाची 50 टक्के रक्कम 45 कोटी 42 लाख 26 हजार, राज्य शासनाची 25 टक्के रक्कम 22 कोटी 71 लाख 12 हजार तर नगरपालिकेची 25 टक्के रक्कम 22 कोटी 71 लाख 13 हजार रुपये यानुसार रक्कमेचा भरणा केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत भोळे बोलत होते. याप्रसंगी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक प्रा. सुनिल नेवे, प्रा. दिनेश राठी, किरण कोलते, राजेंद्र आवटे, रमेश नागराणी आदी उपस्थित होते.

दिवसाला येणार 50 लाख रुपयांचा खर्च
राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार 16 मे 2016 व 12 जुलै 2016 नुसार विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार प्रकल्पाची निवीदा प्रक्रिया व अंमलबजावणी मुदतीत पूर्ण करणे पालिकेस बंधनकारक राहिल. यामध्ये पालिकेतर्फे 22 कोटी रुपये 14 व्या वित्त आयोगातून वर्ग करण्यात येणार आहेत. त्यापैकी 3 कोटी 51 लाख रुपयांचा निधी यात वर्ग करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पासाठी डी.आय. पाईप्ससह सर्व प्रकारच्या पाईप्सचा देखील निवेदेत समावेश करण्यात येणार आहे. 24 महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. यात पालिकेला दररोज 50 लाख रुपये खर्च येईल. त्यामुळे यासाठी खर्चाचे नियोजन केले जात असून राज्य व देशपातळीवरील कंत्राटदारांनाच याचे काम दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी दिली. तसेच यासाठी स्वतंत्र प्रकल्प विभाग करण्यात आला असून त्यात 2 अभियंता आणि 4 कारकून नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी रेल्वे तसेच महामार्गा प्राधीकरणच्या परवानग्या घेण्यात येणार असून जितक्या लवकर परवानग्या मिळतील तितक्या लवकर कामास सुरुवात होणार असल्याचेही मुख्याधिकारी बाविस्कर यांनी स्पष्ट केले.

नदीपात्रात उभारणार बंधारा
या योजनेसाठी तापी नदीपात्रात बंधारा उभारण्यात येऊन धरणातून पाण्याचे आर्वतन न घेता पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन तेथून पाण्याची उचल केली जाईल. बंधार्‍यामुळे पिकनिक स्पॉट, नौकाविहार, उद्यान, वॉटर पार्क आदी सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. तसेच जलवाहिनीद्वारे शेवटच्या टोकाला 13 मीटर उंचीवर पाणी पोहचविणे सहज शक्य होणार आहे. तसेच सद्यस्थितीत धरणातून 5 आर्वतन घ्यावे लागतात. मात्र या बंधार्‍यामुळे एकही आर्वतनाची गरज पडणार नाही. 2046 मध्ये शहराला असणारी पाण्याची गरज लक्षात घेवून त्याची आत्ताच तरतूद करण्यात आली आहे. तसेच यात राखीव पाण्याचे देखील नियोजन असून यातून जवळपास 5 ते 6 महिने शहराला पाणी मिळू शकते.

रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरु
पालिकेत वरिष्ठ कर्मचार्‍यांची 39 पदे आहेत. त्यापैकी केवळ 9 कार्यरत असून 30 पदे रिक्त आहेत. यामुळे पालिकेच्या कामकाजात तसेच शहराच्या विकासकामांमध्ये अनेक अडचणी येत असतात. अतिशय कमी मनुष्यबळावर संपूर्ण पालिकेचा रहाटगाडा चालवावा लागतो. त्यामुळे हे कर्मचारी मिळविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. तसेच अमृत योजनेच्या अनुषंगाने अनुभवी कर्मचार्‍यांची आवश्यकता असून तीन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेचे माजी पाणी पुरवठा अधिकारी ए.बी. चौधरी, जळगाव मनपाचे अ.वा. जाधव तर आस्थापना विभागात शेख सलीम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.

तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
पालिका रुग्णालयात तीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बालरोगतज्ञ, दंतरोग तज्ञ, ऑर्थोपेडीक्स अशा तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. हे डॉक्टर याठिकाणी विनामुल्य सेवा देणार आहेत. यासाठी गोदावरी रुग्णालयाशी करार करण्यात आला असून याठिकाणी उपचार घेणारे रुग्ण हे पुढील उपचारासाठी त्यांना सोयीस्कर अशा रुग्णालयात स्वेच्छेने उपचार घेऊ शकतील त्यांच्यावर कुठलेही बंधन राहणार नाही.याचा फायदा शहरातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मिळणार आहे. तसेच औषध पुरवठा होण्याकडे देखील विशेष लक्ष दिले जाणार असून पालिका रुग्णालयात प्रत्येक आजारावर उपचार केले जातील. त्यामुळे येत्या काळात मुलभूत गरजांना लक्षात घेवून त्यादृष्टीने कामकाज केले जाणार असल्याचे नगराध्यक्ष भोळे यांनी सांगितले.

अमृत योजना हि भाजपा सरकारच्या कार्यकाळात लागू करण्यात आली असून याचे खरे श्रेय हे ज्यांनी हि योजना लागू केली त्या पंतप्रधानांचाच जाते. यासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा केला. स्वत: नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांनी 19 वेळा वरिष्ठ अधिकार्‍यांशी भेटी देऊन पाठपुरावा केला आहे. मागील सत्ताधार्‍यांनी यासाठी काय केले हे यावरुन दिसून येते. अमृत योजना हि भविष्याची वेध घेणारी आहे. 2 वर्षात हि योजना पूर्ण होणार असून तीन वर्षात शहरात परिवर्तन होईल.
प्रा. सुनिल नेवे, नगरसेवक