भुसावळ : सद्यस्थितीत शहरात असलेली पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने पाऊले उचलले आहे. शहराचा अमृत योजनेत सहभाग झाला असून या योजनेअंतर्गत 45 एमएलडी क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येईल. यातून 45 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प शहरात उभा राहिल मात्र सध्याचे पाण्याचे स्त्रोत या प्रकल्पासाठी अपुरे पडत असून आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांसह पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सोमवार 19 रोजी नदीकाठातील नविन स्त्रोतांची पाहणी केली. व या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त पाणी कशा प्रकारे साठविता येईल याच्या नोंदी घेतल्या. शहरात पाणी पुरवठ्याची तीव्र समस्या असल्यामुळे बहुतांश भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच सध्याची पाणी पुरवठा यंत्रणा हि कालबाह्य झाल्याने जीर्ण झाली आहे. यात वारंवार बिघाड होत असल्यामुळे पाणी पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असतात. हि समस्या कायमची सोडविण्यासाठी अमृत योजना शहराला लाभदायी ठरणार आहे. याअंतर्गत पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनासह पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर साचणारे पाणी नदी पात्रापर्यंत वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.
270 कोटी 35 लाख रुपयांचा खर्च
सध्याची पाणी पुरवठा यंत्रणा हि त्या काळच्या लोकसंख्येच्या आधारे उभारण्यात आली होती त्यामुळे यात पाण्याची साठवण क्षमता देखील कमी होती. मात्र आता अमृत योजनेसाठी 2048 पर्यंत शहरात वाढणार्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाणी पुरवठा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरात दरवर्षी 45 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा राहिल. या प्रकल्पासाठी 270 कोटी 35 लाख रुपयांचा अंदाजित खर्च आहे.
बंधारा उभारणार
सध्या यंत्रणेवरुन दोन जलकुंभातून शहराला पाणी पुरवठा केला जात असून हा अपुर्ण दाबाने मिळत आहे. मात्र अमृत योजनेअंतर्गत शहरात 12 ठिकाणी उच्चक्षमतेच्या जलकुंभाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे सद्य स्थितीत असलेले पाण्याचे स्त्रोत हे कमी पडत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नविन स्त्रोतांसंदर्भात नदीपात्रात पाहणी करण्यात आली. यावेळी तापी नदीपात्रातील जुन्या फर्शी पुलाच्या पलीकडे तसेच जुन्या बंधार्याच्या अलीकडे पाहणी करण्यात आली. यावेळी अभियंत्यांनी येथील पाण्याचा प्रवाह लक्षात घेवून नोंदी केल्या. यानंतर आता नविन बंधारा उभारण्यात येणार आहे.
पुलासह बंधार्याचे काम
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नदी पात्रातून नविन पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव असून शासनाच्या विविध निधीतून या पुलासह बंधार्याचे काम करण्यात यावे, म्हणजेच खाली बंधारा व त्यावरच पुलाची निर्मिती करणे शक्य आहे का याची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, विभागीय अभियंता एस.एल. पाटील, पाणी पुरवठा अभियंता ए.बी. चौधरी उपस्थित होते.