147 कोटी रुपये महापालिकेला मिळणार, आयुक्तांची माहिती
पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन टप्प्यात जलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी अमृत योजनेंतर्गत सादर केलेल्या आराखड्याला राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ’हाय पॉवर’ कमिटीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील 147 कोटी रुपयांचे अनुदान या प्रकल्पासाठी महापालिकेला मिळणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार
शहरातून वाहणार्या पवना आणि इंद्रायणी नदीच्या काठी तीन-चार ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येतील. त्यामुळे या नद्यांमध्ये प्रकल्पात शुद्धीकरण केलेले पाणी सोडले जाईल. बोपखेल, चिखली, पुनावळे, पिंपळेनिलख, ताथवडे या ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येतील. चिखली येथील प्रकल्पाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे.
290 दशलक्ष लीटर सांडपाण्याची दररोज निर्मिती
महापालिकेच्या हद्दीत रोज 290 दशलक्ष लीटर (एमएलडी) सांडपाणी तयार होते. त्याच्या शुद्धीकरणासाठी महापालिकेने नऊ ठिकाणी प्रकल्प उभे केले आहेत. त्यांची क्षमता 333 एमएलडी आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडल्यास, उजनी धरणात नदीतून जाणारे पाणी प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे. शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. अनेक पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत. दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. पाणी गळती होत आहे. अमृत योजनाच्या माध्यमातून महत्त्वाची कामे सुरू होतील, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.
कचर्याच्या समस्येवरही काम सुरू
शहरातील विविध विकासकामांच्या 450 निविदा अंतिम टप्प्यात आहेत. शहरात कचर्याची समस्या मोठी आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. 100 किलो ओला कचरा जमा होणार्या सोसाट्यांमध्ये कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येईल. प्रबोधन करून कंपोस्ट खत प्रकल्प तयार करण्याची सक्तीदेखील सोसाट्यांना केली जाईल. स्मार्ट सिटीचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. दोन महिन्यात त्याचा डीपीआर तयार होईल, असेही आयुक्तांनी सांगितले.