भिवंडी । अमेझॉन व डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीचे कर्मचारीच कंपनीला चुना लावत होते. ही धक्कादायक बाब भिवंडी गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. ग्राहकांना या वेबसाईटवरुन लाखोंचे महागडे मोबाईल डिलिव्हर केले जातात. पण या कंपनीच्या कर्मचार्यांनी मिलीभगत केली अन् नंतर गोत्यात आले. कंपनीचे कर्मचारीच या मोबाईल्सवर डल्ला मारुन मुंबईतील मनिष मार्केटमधील एका दुकानदाराला विकत होते. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी आतापर्यत 9 जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी डिलिव्हरी डॉट कॉममधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक मकबूल हुसेन रफिकउद्दीन बडाभैया, सचिन उर्फ सच्चू अनंता पाटील, अल्ताफ नईम खान, तर अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पताके, जगदीश वाजे, आशिष डामसे, अशी अटक केलेल्या 8 आरोपींची नावे आहेत. तर मृगेश वीरेंद्र ध्रुव, असे मुंबईतील मनिष मार्केटमध्ये चोरीच्या मोबाईलची विक्री करणार्या मालकाचे नाव आहे. आतापर्यत याप्रकरणात 9 आरोपींकडून 405 मोबाईल, 3 लॅपटॉप असा 46 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखी मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत होणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली आहे.
भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील डिलिव्हरी डॉट कॉम या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून अमेझॉन कंपनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यत पोहोचवते. अशावेळी ग्राहकांनी वस्तू स्वीकारण्यास नकार दिल्यास अथवा पत्ता न सापडल्यास अशा वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कंपनी सीलबंद करते. अन् पुन्हा माघारी अमेझॉन कंपनीकडे पाठवते. परंतु मागील चार महिन्यात अमेझॉन कंपनीस मिळणार्या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीकडे तक्रार केली. कुरिअर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस ठाण्यात लाखो रुपयांच्या मालाचा परस्पर अपहार झाल्याची तक्रार दाखल केली.याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. या पथकाने तपास सुरू केला. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आपल्याकडील महागडे मोबाईल मुंबईतील मनिष मार्केट मधील आरोपी दुकानदार मृगेश वीरेंद्र ध्रुव यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याठिकाणी सापळा रचून पोलीस पथकाने या दुकानदाराला अटक करून शेकडो मोबाईल हस्तगत केले.
अमेझॉनची अळीमिळी गुपचिळी
दरम्यान अमेझॉन कंपनीच्या ज्या किमती वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कुरियर कंपनीकडे माघारी येत होत्या, त्या अमेझॉन कंपनीकडे पाठविण्याची जबाबदारी उमेश गुळवी याची होती. या वस्तूंच्या कार्टनवरील सील ड्रायव्हरच्या मदतीने बाहेर परस्पर काढून त्यामधील किमती मोबाईल, लॅपटॉप हे बाजूला काढून रिकामे बॉक्स कार्टनमध्ये ठेवून ते अमेझॉन कंपनीस दिले जात होते. या कार्टनसोबत कार्टनमधील वस्तूंची विगतवार यादी असायची. त्याबाबत या आरोपींशी संगनमत करून कोणतीही शहानिशा न करता कार्टन ताब्यात घेण्याचे काम अमेझॉनमधील 4 कर्मचारी हे करत होते. मागील ऑक्टोबर 2017 पासून ही टोळी अशा पद्धतीने काम करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.