धामपूर-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसह केरळमधील वायनाड या दोन मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे आजच कॉंग्रेसने जाहीर केले आहे. वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णयाला डाव्या पक्षांचा विरोध होत असतांना आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींना अमेठी मतदारसंघात आपला पराभव होणार याची खात्री असल्यानेच घाबरून त्यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला अशी बोचरी टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील धामपूरमधील सभेत शहा बोलत होते.
काँग्रेस आणि विरोधकांवर टीका करतांना अमित शहा यांनी ‘विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कितीही लांगुलचालनाचे कितीही राजकारण केले तरी त्यांचे पोट भरत नाही. काही दिवसांपूर्वी पंचकुलाच्या एका कोर्टाने सन २००७मध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी निर्णय दिला. त्यावेळी समझोता एक्स्प्रेसमधील स्फोट हे हिंदू दहशतवादाचे उदाहरण आहे, असे काँग्रेसच्या सरकारने म्हटले होते. संपूर्ण जगात विश्व बंधुत्व वाढणाऱ्या हिंदू समुदायाला दहशतवादाशी जोडून बदनाम करण्याचे काम काँग्रेसने केले आहे’ असे आरोप केले.