अमेरिकनांना 500 कोटींना चुना लावणार्‍या शॅगी ठक्करला अटक

0

मुंबई : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या महाठग सागर उर्फ शॅगी ठक्कर याला शनिवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. बोगस कॉल सेंटरद्वारेे शॅगीने अमेरिकन नागरिकांना तब्बल 500 कोटी रुपयांना चुना लावला. दुबईला पळून गेलेल्या सागरचे संयुक्त अरब अमिरातीने भारताला प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला मुंबईला आणण्यात आले.

मीरा रोड येथे चालवण्यात येणार्‍या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून सागर अमेरिकन नागरिकांना धमकावून त्यांची आर्थिक फसवणूक करीत होता. या गोष्टीचा सुगावा पोलिसांना लागल्यानंतर त्याच्या कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आलेे आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना सागरच्या काळ्या धंद्याचा सुगावा लागताच सागरने दुबईला पळ काढला. त्याला दुबईमध्ये अटक करून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले.

सागरची मोडस ऑपरेंडी
कर न भरणार्‍या आणि कर्जावर रक्कम घेणार्‍या अमेरिकन नागरिकांना ठाण्यातील या कॉल सेंटरमधील कर्मचारी फोन करीत असत. हा कॉल अमेरिकन सरकारकडून आला असल्याचे त्यांना भासवले जात असे. त्यानंतर आम्ही सांगतो तितकी रक्कम त्वरित भरा अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येईल, अशा प्रकारे त्यांना धमकावण्यात येत असे. या धमकीला बळी पडून अनेक अमेरिकन नागरिकांनी रक्कम जमा केली होती. या मोडस ऑपरेेंडीतून सागरने तब्बल 500 कोटी रुपयांची माया गोळा केली होती.

3 कोटींची ऑडी प्रेयसीला भेट
शॅगीने क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ऑडी आर-8 ही गाडी विकत घेऊन आपल्या प्रेयसीला भेट दिली होती. या गाडीची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणाशी विराट कोहलीचा काहीच संबंध नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अहमदाबादमध्ये बोगस कॉल सेंटरचे तंत्र अवगत
मुंबईतील बोरिवली या उपनगरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात सागर ठक्करचा जन्म झाला. त्याला बोगस कॉल सेंटर चालवण्याचे तंत्र अहमदाबादला अवगत झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. अहमदाबाद येथे बोगस कॉल सेंटर सुरू केल्यानंतर सागरने मीरारोड-भाईंदर या ठिकाणी कॉल सेंटर सुरू केले. मीरारोड येथील कॉल सेंटरचा 5 ऑक्टोबरला पोलिसांना सुगावा लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर ठाणे पोलिसांनी 12 ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला.