न्युयोर्क- जपानच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर अमेरिकन मरीन कॉर्प्सच्या दोन विमानांचा अपघात झाला यात सहा नौसैनिक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. हवेमध्ये इंधन भरण्याचा सराव सुरु असताना कदाचित दोन विमानांची टक्कर झाली असावी असा अंदाज या अपघातामागे वर्तविण्यात येत आहे.
अमेरिकन मरीन कॉर्प्स हा अमेरिकन सैन्य दलाचा भाग असून मरीन कॉर्प्स हे नौदल, हवाई दल आणि लष्कराबरोबर विविध सैन्य अभियानामध्ये सहभागी होत असतात. बचाव पथकांनी सात नौसैनिकांपैकी एकाला वाचवले आहे असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. शोध आणि बचाव मोहिम सुरु आहे असे अमेरिका आणि जपानी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जपानच्या किनाऱ्यापासून ३२२ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली असे मरीन कॉर्प्सने पत्रकात म्हटले आहे. केसी-१३० हरक्युलस आणि एफ/ए-१८ फायटर विमानाने मरीन कॉर्प्सच्या इवाकुनी तळावरुन उड्डाण केले होते. हवेमध्ये केसी-१३० हरक्युलस मधून एफ/ए-१८ फायटर जेटमध्ये इंधन भरण्याचा सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली. नेमकं त्यावेळी काय घडलं ते मरीन कॉर्प्सने अजून स्पष्ट केलेलं नाही. जपानी नौदलाकडून बेपत्ता नौसैनिकांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम सुरु आहे. या दुर्घटनेमागे कोणताही घातपात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.