ट्रम्प कन्या इव्हान्का यांचे प्रतिपादन
हैदराबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्र बटन दाबून जीइएस संमेलन 2017 चे थाटात उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना इव्हान्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. भारतासाठी आपण जे काही करत आहात त्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेचे नागरिक भारताकडून प्रेरणा घेत आहेत. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये भारतचा एक सच्चा मित्र आहे. एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, याचा अर्थ मोदींसाठी सर्व काही शक्य आहे, अशी कौतुकोद्गार इव्हान्काने काढले.
कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल
इव्हान्का म्हणाली, हैदराबाद खूप वेगाने प्रगती करत आहे. यासाठी मोदींना धन्यवाद दिले पाहिजेत. आपण जे करत आहात ते अभिनंदनास पात्र असून, मोदी हे कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवत आहेत. ट्रम्प कन्या इव्हान्का मंगळवारी भारतात पोहोचली. तीन दिवस चालणार्या जीइएस संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या इव्हान्काने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली व चर्चा केली.
भारतीय महिलांचे कार्य प्रेरणादायी
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतात महिलांचा इतिहास खूप मजबूत आहे. राणी अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मातीसाठी लढाई लढली. कल्पना चावला, सुनीता विल्यम्सने अंतराळ संशोधनात ठसा उमटवला. हैदराबादसारख्या शहरातून सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि सानिया मिर्झासारख्या खेळाडूंनी देशाचे नाव मोठे केले. आम्ही शहरी व ग्रामीण भागात महिलांचे एक तृतीयांश प्रतिनिधीत्व सुनिश्चित करत आहोत. भारतीय महिलांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. या संमेलनातही महिलांची संख्या निम्मी आहे. सर्वच क्षेत्रात भारत आज वेगाने प्रगती करत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण उपस्थित होत्या.
वुमेन फर्स्ट, प्रॉस्पेरिटी फॉर ऑल
भारतात होत असलेल्या या तीन दिवसीय जीईएस 2017 संमेलनात 127 देशातील 1200 संमेलनार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये भारतातील सुमारे 400, अमेरिकेचे 350 आणि दुसर्या देशातील अन्य प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. वुमेन फर्स्ट, प्रॉस्पेरिटी फॉर ऑल हा या संमेलनाचा विषय असून, संमेलन 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.