अमेरिकावारीतून काय साधणार?

0

आपले पंतप्रधान अमेरिकेत गेले. अमेरिकेने त्यांचे पुन्हा एकदा उत्साहात स्वागत केले. नरेंद्र मोदी यांचे अशाप्रकारे अमेरिकेत होणारे हे दुसरे स्वागत आहे. त्या देशातील सत्ता परिवर्तनानंतर आणि जागतिक पटलावर निर्माण झालेल्या विविध प्रश्नांचा संदर्भ घेता, मोदींची ही भेट तशी चांगली झाली. किंबहुना, ही भेट तशी चांगलीच होणार होती. अमेरिका हा जगातील प्रमुख शस्त्र निर्यातदार देश आहे. तर भारत हा अमेरिकेचा ‘ठळक’ ग्राहक आहे. ठळक यासाठी नमूद केले, की सर्वाधिक शस्त्रे हा देश खरेदी करत असतो, त्यामुळेच तेथील अर्थव्यवस्था बर्‍यापैकी टिकून आहे. भारत शस्त्रे घेतो म्हणून पाकिस्तानही घेतो. या दोन देशातील तणाव कायम रहावा आणि आपली शस्त्रविक्रीही जोरात सुरु रहावी, यासाठी अमेरिकेचे सत्ताधीश डोके चालवत असतात. त्यामुळे भारत असो, की पाकिस्तान या दोन्ही देशांच्या प्रमुखांचे स्वागत व्हाईट हाऊसमध्ये अशाचप्रकारे जोरात होणार आहे, यापूर्वीही होत गेले; त्यात नाविन्य असे काहीच नाही. कालच्या भेटीतदेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कशाच्या बाबतीत खास आभार मानले असतील तर ते शस्त्रखरेदीच्या बाबतीतच मानलेत. तर अमेरिकेसारखी शस्त्रे जगात कुठेही बनत नाहीत, असे प्रमाणपत्र मोदींनी या भेटीत देऊन अमेरिकेला खुश केले.

आम्हाला मोदींच्या विदेशनीतीचे खास करून कौतुक वाटते. कोणताही शेंडा आणि बुडूख नसलेली ही विदेशनीती काय दर्शविते तेच कळत नाही! भारतावर जेव्हा इंग्रजांची सत्ता होती तेव्हा त्यांनी एक धोरण अवलंबविले होते; ‘फोडा, झोडा आणि राज्य करा.‘ भारताच्या बाबतीत हीच नीती अमेरिका वापरत आहे, आणि त्याची जाणिव भारतीय नेतृत्वाला होऊ नये? या करंटेपणाला काय म्हणावे? इंग्रज देशातून गेले खरे परंतु त्यांनी या अखंड देशाचे तीन तुकडे करून दिले. बांगलादेश आणि पाकिस्तान या तुकड्यांच्या रुपाने इंग्रजांचा काळा इतिहास या देशाच्या डोळ्यासमोर आहे. बरे, ही फाळणी काही सहजासहजी झाली नाही. रक्ताचे पाट वाहिले, फाळणीचे दुःख आजही देशातील प्रत्येकाच्या हृदयात घर करून आहे. आठवण काढली की वेदनांची खपली निघून जखम ताजी होते. इतक्या कटू अनुभव आणि वाईट काळानंतरही हा देश मजबुतीने उभा राहिला; कारण या देशाकडे पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व होते. आपसातील मतभेदांकडे दुर्लक्ष करून या नेत्यांनी भारताच्या पायाभरणीकडे लक्ष दिले. मजबुतीने विविध पातळ्यांवर देश उभा केला. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीशच काय, परंतु जगातील कोणत्याही देशापुढे भारताने कधी लाळघोटपणा केला नाही. स्वाभिमानाने हा देश उभा राहिला. परंतु, अलिकडे कणखर नेतृत्वाचा गवगवा करणारे मोदी अमेरिकेचे मांडलिकत्व पत्कारतात की काय, याची भीती वाटू लागली आहे.

आम्ही मोदींचे आजच्या प्रसंगी अभिनंदनच करतो. ते पुन्हा एकदा अमेरिकेच्या दारात गेले यासाठी नव्हे तर त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील उद्योगपतींना भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले. मागील भेटीच्यावेळीही मोदींनी असेच निमंत्रण दिले होते. झाले काय? किती गुंतवणूक आली? याचे उत्तर देण्याचे धाडस एकदा पंतप्रधानांनी दाखवावेच! अमेरिकेच्या दारात जाऊनही गुंतवणूक येत नसेल, तर आपले पंतप्रधान व्हाईट हाऊसचे उंबरठे का झिजवत आहेत? बरे, अमेरिकेत जाऊन मोदी बोलले काय? तर सर्जिकल स्ट्राईकबाबत स्वतःची पाठ थोपटून घेतली. दहशतवादाविरोधात अमेरिकेने भारताला साथ द्यावी, असे आवाहन केले. दहशतवाद हा केवळ भारताचाच प्रश्न आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही, असे आहे. हाच प्रश्न शेजारच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांनाही सतावतो आहे. इसिसचा भस्मासूर जगाच्या कानाकोपर्‍यात फैलावला असून, तो आता मुस्लीमांच्याच मूळावर उठल्याचे प्राकर्षाने जाणवते आहे. हे दहशतवादी कोण आहेत? त्यांना कुणी जन्मास घातले? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले तर सर्वांचे बोट अमेरिकेच्या धोरणाकडे जाते. जगातील सर्व दहशतवादाची जननी ही अमेरिकाच असून, आशियाई असो की युरोप असो, किंवा अरब राष्ट्रे असोत. सर्वच भागातील दहशतवादाला अमेरिकेच्या धोरणामुळेच खतपाणी घातले जाते.

अमेरिकेच्या धोऱणामुळेच दहशतवादाचा जन्म होतो. किंबहुना, दहशतवाद जन्माला यावा, अशीच धोरणे अमेरिका राबवित असते. जोपर्यंत जगात दहशतवाद राहील, तोपर्यंत अमेरिकेत निर्माण झालेली शस्त्रे विक्री होत राहतील. शस्त्रे विकूनच अमेरिकेचे पोट भरते. आणि, शस्त्रे विकण्यासाठी भारत हा जसा अमेरिकेचा ग्राहक आहे, तसाच पाकिस्तानही आहे. अमेरिकेत निर्माण झालेल्या शस्त्रांच्या सहाय्यानेच भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध लढत असतात. भारतीय सैन्याकडे ‘अमेरिका मेड’ शस्त्रे आहेत, तशीच भारताविरुद्ध पेटून उठलेल्या दहशतवाद्यांकडेही हीच शस्त्रे आहेत. म्हणूनच, आम्हाला नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीचे मोठे अप्रूप वाटते. अमेरिकेच्या वार्‍या करून मोदींच्या हाती काहीही लागणार नाही. भारताच्या पदरातही काही पडणार नाही. भारताला भिकेचे डोहाळे लागलेले आहे, हे त्या देशाचे नेतृत्व जाणून आहे. जागतिक पातळीवरील विविध सत्ता हाती एकवटल्याने भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज भासत असते. त्यापोटी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचे काम आपल्या देशातील नेतृत्वाकडून वारंवार होत आले आहे. परंतु, एकवेळ भारत अन् पाकिस्तानने अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करायची नाही, असे ठरवले तर मात्र जगाचा हा दादा जमिनीवरच नाही तर चक्क वठणीवर येईल. अमेरिका दहशतवादाविरोधात बोलत असेल तर ते मगरीचे अश्रू आहेत. भारतीय नेतृत्वाने, खास करून नरेंद्र मोदी यांनी हे पक्के लक्षात ठेवावे. बाकी, दुसर्‍या अमेरिकावारीबद्दल मोदींना आमच्या शुभेच्छा!