प्रत्येक दिवशी तीन लाख माणसे मरणार
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र परीक्षणावरून सध्या संपूर्ण कोरियन द्वीपक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात अमेरिकेकडून उत्तर कोरियाला सातत्याने कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. उत्तर कोरियाही अमेरिकेसह संपूर्ण जगालाच अण्वस्त्रांची भीती दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर एका अहवालानुसार, उत्तर कोरियाशी जर युद्ध पेटलेच, तर अण्वस्त्रांचा वापर न करताही लाखो लोक मारले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही स्थिती इतकी भयानक असणार आहे की युद्धाच्या पहिल्याच दिवशी तीन लाख लोक मारले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर यामुळे अडीच कोटी नागरिक प्रभावित होणार आहेत.
काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस या अमेरिकन काँग्रेसच्या थिंक टँकच्या अहवालानुसार ब्लूमबर्गने यासंदर्भातील नुकसानीचा अंदाज वर्तवला आहे. या 62 पानांचा हा अहवाल अमेरिकन लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आला आहे. या अहवालानुसार, जर युद्धाचा भडका उडालाच तर कोरियाई द्वीपक्षेत्रातील लोकसंख्येच्या घनतेच्या हिशेबानुसार 2.5 कोटी जनतेला याची झळ सहन करावी लागणार आहे. यात एक लाखाच्या आसपास अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. अमेरिकेसाठी हे युद्ध चांगलेच नुकसानदायी ठरण्याची शक्यता आहे. या युद्धासाठी कोरियन द्वीपात मोठ्या संख्येने अमेरिकन सेना एकत्र येईल. अशा स्थितीत लष्कराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या युद्धात चीनही उडी घेण्याची शक्यता असून, यामुळे हे युद्ध कोरियाई द्वीपक्षेत्राच्या बाहेरही पसरण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान संभवते, असेही या अहवालात म्हटले आहे. उत्तर कोरियाने आपल्या केवळ पारंपरिक शस्त्रास्त्रांचा जरी वापर केला, तरी पहिल्याच दिवशी तीस हजारांपासून तीन लाख लोक मारले जाऊ शकतात. उत्तर कोरियाकडे प्रती सेकंद दहा हजार राउंड फायरिंगची क्षमता आहे. घोषणा झाल्यानंतर युद्धाची व्याप्ती वेगाने वाढवत यात चीन, जपान व रशिया या देशांच्या लष्करालाही उत्तर कोरिया युद्धाच्या खाईत लोटू शकतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. हा बाँब अणुबाँबपेक्षा बराच शक्तिशाली आहे तसेच तो दूरच्या पल्ल्यावर मारा करणार्या क्षेपणास्त्रांवर बसवता येईल, असाही उत्तर कोरियाचा दावा आहे. या देशाच्या सरकारी माध्यमांनी ही चाचणी अचूकरीत्या यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. दुसर्या महायुद्धानंतर कोरियन द्वीपकल्पाचे विभाजन झाले. कम्युनिस्ट प्रभावाखाली उत्तर कोरियात हुकूमशाही आकाराला आली. उत्तर कोरिया जागतिक पटलावर पूर्णपणे एकटा पडला आहे. आम्हाला संपवू पाहणार्या जगाविरुद्ध फक्त अण्वस्त्रंच आमचे संरक्षण करू शकतात, असे उत्तर कोरियाच्या नेतृत्वाला वाटते.काही विश्लेषकांना हे दावे काळजीपूर्वक घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील गुप्तचर अधिकारीही मान्य करतात की उत्तर कोरियाकडे हे बाँब लहान स्वरूपात साकारण्याची क्षमता आहे. उत्तर कोरिया अमेरिकेला मुख्य शत्रू मानते. पण उत्तर कोरियाकडे दक्षिण कोरिया आणि जपानच्या रोखाने रॉकेट आहेत. या दोन्ही देशांत अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. संयुक्त राष्ट्रांनी सातत्याने उत्तर कोरियावर कठोर निर्बंध लादले आहेत. पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. उत्तर कोरियाचा एकमेव मित्र असलेल्या चीननेसुद्घा उत्तर कोरियावर आर्थिक आणि राजकीय दबाव टाकला आहे.
अमेरिकेबरोबर वाद नेमका काय?
1910 ते 1945 या काळात उत्तर आणि दक्षिण कोरिया हा एकच देश होता. या देशावर जपानचा ताबा होता. 1945 मध्ये जेव्हा दुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाला तेव्हा सोव्हिएत रशियाने कोरियाच्या उत्तर आणि अमेरिकेने दक्षिण भागावर वर्चस्व मिळवले. 1945 ते 1948 सालापर्यंत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्याकडे असलेल्या ताब्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर अखेर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अशा दोन वेगवेगळ्या देशांची स्थापना करण्यात आली. उत्तर कोरियात रशिया आणि चीन पुरस्कृत सरकारची स्थापना झाली, तर दक्षिण कोरियात अमेरिका पुरस्कृत सरकारची स्थापना करण्यात आली. 1950 साली उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला आणि मोठ्या भागावर ताबा मिळवला. दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी अमेरिकेने सैन्य पाठवले आणि उत्तर कोरियाला पळवून लावले, तर चीनने या युद्धात उत्तर कोरियाची साथ दिली. चीनने उत्तर कोरियाच्या मदतीसाठी एक लाखांपेक्षा अधिक चिनी सैनिक पाठवले होते.‘ज्या गोष्टीत जिंवतपणा वाटत होता, त्या प्रत्येक गोष्टींवर आम्ही बाँबहल्ला केला होता’, हे वाक्य आहे अमेरिकाचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री डेयान रस्क यांचे. ते कोरियन युद्धादरम्यान (1950-1953) उत्तर कोरियावर अमेरिकेने केलेल्या बाँबच्या वर्षावाबाबत सांगत होते. अमेरिकी संरक्षण खात्याचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या तज्ज्ञांनी या मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन स्ट्रँगल’ असे ठेवले होते. अनेक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार तीन वर्षे सतत उत्तर कोरियावर हवाई हल्ले केले जात होते. कोरियन राजकारणात अमेरिकेच्या इतिहासातील ही अशी पाने आहेत, ज्याविषयी अमेरिकन नागरिकांना फारशी माहिती दिली गेलीच नाही. असे जेम्स पर्सन सांगतात. जेम्स पर्सन हे कोरियन राजकारण आणि इतिहासाचे जाणकार आहेत. सध्या ते वॉशिंग्टनच्या विल्सन सेंटरमध्ये कार्यरत आहेत. दुसर्या महायुद्धानंतर आणि व्हिएतनाम युद्धाआधी कोरियन युद्ध झाले होते. उत्तर कोरियावर या युद्धाचे मोठे घाव आहेत. ते अजूनही या युद्धाच्या आठवणी विसरलेले नाहीत.
– अमोल देशपांडे
वृत्त समन्वयक, जनशक्ति, मुंबई
9987967102