जम्मू । फारुख अब्दुल्ला यांच्या काश्मीर मुद्द्यावर अमेरिका-चीनला समाविष्ट करून घेण्याच्या मुद्द्याचा काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी समाचार घेतला. काश्मीर मुद्द्यावर कोणत्याही तिसर्या पक्षाला समाविष्ट करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेला या चर्चेत सहभागी करून घेतले तर काश्मीरची अवस्था सीरियासारखी होईल, असा इशारा त्यांनी दिला. पाकिस्तानसोबत होणार्या चर्चेवर जोर देताना त्या म्हणाल्या की आपण मिळून संवाद साधला तर तुर्कीस्तान, अमेरिका यात काहीच हस्तक्षेप करू शकत नाहीत. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथे एका इस्पितळाचे उद्घाटन केल्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
गरिबी, बेकारी यांना प्राधान्य द्या
आपले अनेक जवान दररोज सीमेवर शहीद होत आहेत. हे थांबविण्यासाठी याचे लवकरात लवकर निरसन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरीबी, मागासलेपण, अशिक्षितपणा, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांचा दोन्ही देशांना रोज सामना करावा लागत आहे. ते प्रश्न सोडविणे ही आवश्यक आहे. मात्र त्याधी या मुद्द्यावर बसून बोलून, चर्चा करून समस्या सोडवणे आवश्यक आहे.
अमेरिका, चीनला दूर ठेवा
अमेरिका आणि चीन यांनी स्वतःच्या कामाशी काम ठेवावे. त्यांनी ज्या देशांमध्ये हस्तक्षेप केला आहे त्यांची काय दुर्दशा झाली आहे ते सर्वज्ञात आहे. त्यामुळे आम्हाला आमची परिस्थिती सीरिया , इराक सारखी करून घ्यायची नाही. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना आपापल्या करारांचा सन्मान केला पाहिजे असे मत त्याने व्यक्त केले. वाजपेयी यांनी भारत पाकिस्तानला काश्मीरसाठी सतत संवाद कायम राखण्यास सांगितले होते याची आठवण त्यांनी करून दिली. त्यानुसार शिमला आणि लाहोर यातील करार आपल्याला पुढे नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.