वॉशिंग्टन | अमेरिकी पॅसिफिक फ्लीट कमांडर स्कॉट स्विफ्ट यांनी म्हटलेय, की राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला तर पुढच्याच आठवड्यात जाऊन चीनवर अणुबॉम्ब टाकीन! ऑस्ट्रेलियाच्या समुद्र तटावर अमेरिका-ऑस्ट्रेलिया संयुक्त युद्धाभ्यासानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत कमांडर स्कॉट स्विफ्ट यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नावर हा उत्तराचा बॉम्बगोळा टाकला. दुसरीकडे, अमेरिकीचे माजी रिपब्लिकन सिनेटर लॅरी प्रेसलर यांनी म्हटलेय, की अमेरिकेने चीनविरोधात भारतीय नौदलाला मदत करायला हवी.
अमेरिकी लष्करातील प्रत्येक जवानाला देशासाठी धोकेदायक असलेल्या देशी-विदेशी शत्रूपासून देशाचे सरंक्षण करण्याची शपथ दिली जाते. वरिष्ठ अधिकारी व राष्ट्राध्यक्ष यांच्या आदेशाचे पालन करण्याची शपथही त्याला अमेरिकी संविधानानुसार घ्यावी लागते. त्यामुळे राष्ट्रपतींचा आदेश झाल्यास ते कार्य करावेच लागेल.
स्कॉट स्विफ्ट, अमेरिकी कमांडर
चीनला संदेश देण्याची संधी
भारत व चीन यांच्यातील सध्याचे तणावाचे वातावरण पाहता, अमेरिकेने भारतीय नौदलाला मदत करावी असे सिनेटर लॅरी प्रेसलर यांनी ‘नेबर्स इन आर्म्स’ या पुस्तकात म्हटलेय. यातून चीनला कठोर संदेश देण्याची संधी आहे, असे ते म्हणतात. भारतीय सैन्याला अणुमदत केल्यास युद्धपिपासू चीन वठणीवर, येईल, असे प्रेसलर यांना वाटतेय. त्यांनी यापूर्वी व्हिएतनाम युद्धात आघाडीवर काम केलेय. फिलिपिन्स आणि व्हिएतनाममध्ये चिनी नौसेना अमेरिकेला आव्हान ठरत आहे. त्याचे उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे प्रेसलर म्हणतात.
चीनचा संपूर्ण जगाला धोका
चीन संपूर्ण जगासाठीच धोकेदायक आहे. दहशतवादीधार्जिण्या पाकिस्तानला चीनने खुलेआम मदत करणे धक्कादायक असल्याचे लॅरी प्रेसलर म्हणतात. दक्षिण महासागरावरून व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई आणि तैवान हे देश समोरासमोर उभे ठाकले आहेत. आम्हाला चीनसोबत समुद्र युद्ध नकोय; पण त्यांना रोखले नाही तर ही जागा वाचविणे कठीण होईल. त्यानंतर मस्तवाल चीनचा जगासाठीचा धोका अधिक वाढेल.
पाकिस्तानला मदतीची धमकी
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे चीन दौऱ्यावर असतानाच चिनी माध्यमांनी धमकी दिलीय, की डोकलाममधून भारतीय सैन्य मागे न हटल्यास चीन काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करू शकतो. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटलेय, की डोकलाम हा चीन-भूतान सीमा वाद आहे. त्यात त्रयस्थ म्हणून हस्तक्षेप करण्याचा भारताला अधिकार नाही. जर भारताला तो हक्क आहे असे वाटत असेल तर मग मोठी खतरनाक स्थिती आहे. कारण काश्मीर समस्येवर पाकिस्तानने मदत मागितली तर चिनी सैन्य काश्मिरात घुसू शकेल. गेल्या 42 दिवसांपासून भारत-चीन सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने आहे. उभय देशांसह भूतानची सीमा इथे मिळते. चीन इथे महामार्ग बनवू पाहतोय ज्याला भारत व भूतानचा विरोध आहे.
प्रत्येक देशाला बसेल फटका
सद्य स्थितीत भारत-चीन युद्ध भडकल्यास त्याचा जगातील प्रत्येक देशाला फटका बसेल, असेही ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटलेय. अजित डोवल ‘ब्रिक्स’ समूहातील ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग भेटत असताना चिनी सरकारी माध्यमाने हा खोडसाळपणा केलाय. डोवल यांनी चीनचे सीमासुरक्षा सल्लागार यँग जेईचे यांच्याशीही भेट घेतली. चीनने डोकलाम व काश्मीर मुद्दा उकरून काढण्याचा तिथे प्रयत्न केला. दुसरीकडे, ‘ब्रिक्स’मध्ये दहशतवादाविरोधात एकत्र काम करण्याचा निर्धारही जिनपिंग-डोवल यांनी व्यक्त केला.