वॉशिंग्टन । आगामी काळात अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणार्या लोकांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिका प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या व्हिसासंदर्भात नवीन नियमावली तयार केली आहे. नवीन नियमांनुसार एखाद्या नागरिकाला व्हिसा देण्याआधी संबंधिताची अतिरिक्त चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने जगभरातील अमेरिकन दूतावासांना दिले आहेत. अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना आता मागील 15 वर्षांचा तपशील द्यावा लागणार आहे. या नवीन नियमाचा भारतीयांनाही बसणार आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी दिलेल्या सूचनांनुसार पर्यटन किंवा व्यवसायासाठी व्हिसा मागणार्या नागरिकांना आता त्यांचा रोजगार, राहण्याचा पत्ता यासंदर्भातील 15 वर्षांचा तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय मागील पाच वर्षांमधील संबंधित नागरिकाचा फोननंबर, ई-मेल आयडी आणि सोशल मीडिया अकाउंटची माहिती द्यावी लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 मार्च रोजी मुस्लीमबहुल देशांमधील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशाबाबत लागू केलेल्या शासकीय आदेशानंतर परराष्ट्र मंत्र्यांनी 15 मार्च रोजी हा नवीन आदेश काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन आदेशाच्या माध्यमातून हिंसा, अपराध आणि दहशतवादी कारवायांसाठी संशयितांना मदत करण्यासाठी अमेरिकेत येणार्या परदेशी नागरिकांना रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय व्हिसा मागण्यासाठी येणार्या नागरिकांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याच्या सूचना अधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्हिसा मिळवण्याचे अनेक अर्ज प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.