अमेरिकेची भारताला अपाचे हेलिकॉप्टर विकण्यास मंजुरी

0

नवी दिल्ली-अमेरिकेने भारताला ९३ कोटी डॉलरमध्ये सहा एएच ६४ इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने याची माहिती दिली. अपाचे हेलिकॉप्टरमुळे भारताच्या हवाई ताकदीत वाढ होणार आहे. अंतर्गत तसेच बाहेरील हल्ल्यांना तोंड देण्यास भारत सक्षम होईल. अपाचे अटॅक हेलिकॉप्टरच्या समोरील भागात असलेल्या सेन्सरमुळे रात्रीही हेलिकॉप्टरचे उड्डाण करता येईल.

काँग्रेसला दिली माहिती
पेंटागॉनच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्णयाची माहिती काँग्रेसला दिली आहे. खासदारांचा विरोध झाला नाही तर ही प्रक्रिया पुढे सरकण्याची आशा आहे.
अटॅक हेलिकॉप्टर व्यतिरिक्त यामध्ये आग नियंत्रण रडार ‘हेलफायर लाँग्बो मिसाइल;, स्टिंगर ब्लॉक आय-९२ एच मिसाइल, नाईट व्हिजन सेन्सर आणि जडत्वीय नौवहन प्रणालीच्या (इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम्स) विक्रीचाही समावेश आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये भारताची संरक्षण क्षमता वाढेल तसेच त्यांचे सैन्यदलही आधुनिक होईल. अंतर्गत आणि बाहेरील हल्ल्यांना तोंड देण्यास भारत आणखी सक्षम होईल, असे पेंटागॉनने काँग्रेसला पाठवलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अपाचे हेलिकॉप्टरच्या प्रस्तावित विक्रीमुळे मूलभूत सैन्य संतुलन बिघडणार नसल्याचेही पेंटागॉनने स्पष्ट केले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण व्यवहार वर्ष २००८ पासून सुमारे ० ते १५ अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे. पुढील दशकापर्यंत सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर भारत अब्जावधी रूपये खर्च करण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.