वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एन्थोनी स्कैमुर यांची व्हाईट हाऊसच्या संवाद संचालकपदी नियुक्ती केली आहे. बर्याच कालावधीपासून ट्रम्प यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणार्या एन्थोनी यांच्यावर मिडीयाशी राष्ट्रपतींचे असलेले संबंध सुधारण्याची जबाबदारी असणार आहे. सीन स्पाईसर हे व्हाईट हाउसचे माजी प्रेस सचिव होते आणि त्यांचा एन्थोनी यांच्या निवडीला विरोध होता. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला.
15 ऑगस्टपासून नवीन जबाबदारी
आपल्या मृदू संभाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले एन्थोनी सध्या एक्जीम बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य धोरण अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. 15 ऑगस्टपासून ते आपला नवीन कार्यभार सांभाळणार आहेत. अमेरिकेकडून केली जाणारी विधाने इथपासून ते आवश्यक धोरणे बनविण्यापर्यंतची जबाबदारी एन्थोनी पाहतील, अशी माहिती व्हाईट हाउसकडून देण्यात आली आहे. याचा सर्व लेखाजोखा ते राष्ट्रपतींना देतील असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या सगळ्यामध्ये अमेरिकन मीडियाशी राष्ट्रपतीशी असलेले संबंध सुधारण्याची जबाबदारी एन्थोनी यांची असणार आहे.