अमेरिकेचे पाकिस्तानात ड्रोन हल्ले

0

ड्रोन हल्ल्यात अनेक ठार, पाक-अफगाण सीमाभागात हल्ले

पेशावर : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमाभागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांसह कुख्यात हक्कानी नेटवर्कला लक्ष्य करत, अमेरिकेने जोरदार ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यात बुधवारी हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा कमांडर इहसान उर्फ खवारीचा खात्मा करण्यात यश आले असून, त्याचे अन्य दोन साथीदारही ठार झाले आहेत. या ड्रोन हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहितीही मिळत आहे. अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यापक ड्रोन हल्ल्याची कारवाई अमेरिकेने केली आहे. दक्षिण वझिरिस्तान भागात हे हल्ले सुरु होते.

मानवरहित विमानांच्या सहाय्याने हल्ले
अमेरिकेने लष्करी मुख्यालयातून नियंत्रित करता येणार्‍या मानवरहित विमानांच्या सहाय्याने हे ड्रोन हल्ले केले आहेत. दक्षिणी वझिरिस्तानच्या सीमाभागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी या विमानांद्वारे क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या भागात अफगाण निर्वासितांच्यादेखील वस्त्या आहेत. या वस्त्यांवरही ही क्षेपणास्त्रे पडल्याची माहिती पाक लष्कराच्या सूत्राने दिली आहे. अमेरिकेने यापूर्वी 17 जानेवारीरोजी बादशाह कोट परिसरात ड्रोन स्ट्राईक केली होती. त्यात एका नागरिकासह दोन संशयितांचा मृत्यू झाला होता. तसेच, डिसेंबरमध्येही 26 तारखेला ड्रोन हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले होते. शिवाय, काही वाहनेही नष्ट झाली होती, असेही लष्करी सूत्राने सांगितले आहे. सीमा भागात अमेरिका सातत्याने ड्रोन स्ट्राईक करत असल्याचेही पाक लष्कराने स्पष्ट केले आहे.

पाक म्हणते, आदिवासी वस्त्यांना झळ
बुधवारी करण्यात आलेले ड्रोन हल्ले हे पाक-अफगाण सीमाभागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून करण्यात आलेले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्त्या असून, या ड्रोन हल्ल्याची त्यांनाही झळ पोहोचत असल्याची ओरड पाकिस्तानने केली आहे. ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी असावी, असा अंदाज असून, हक्कानी नेटवर्कला हे हल्ले जबरदस्त झटका मानले जात आहे. पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी नंदनवन असल्याचा आरोप भारताने नेहमीच केला आहे. तसेच, हक्कानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची मागणीही भारत करत आला आहे. तरीही पाकने काही कारवाई केली नव्हती. आता अमेरिकेच्या हल्ल्याने पाकला मोठा झटका बसला आहे.