अमेरिकेच्या कर्माचे फळ

0

तापमानवाढीमुळे पृथ्वीवर अधिकाधिक वेगवान संहारक वादळे निर्माण होत आहेत. सध्या ’एर्मा’ हे अटलांटिक महासागरातील आतापर्यंतचे सर्वात वेगवान वादळ एकामागे एक कॅरिबिअन बेटांमधील देशांना उद्ध्वस्त करत आहे. या वादळाने आता अमेरिकेतील ’फ्लोरिडा’कडे मोर्चा वळवला आहे. ’फ्रान्स’ देशाएवढा त्याचा आकार आहे. दोन टोकांमधील अंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपेक्षा जास्त आहे. 56 लाख माणसांचे सुरक्षेसाठी फ्लोरिडातून स्थलांतर केले जात आहे. मानवी जगात बलदंड वाटणारा हा देश तापमानवाढीमुळे येणार्‍या प्रचंड वादळांपुढे केविलवाणा ठरत आहे. एर्मा हे या देशाच्या कर्माचे फळ आहे.

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये हार्वे चक्रीवादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले आहे. हार्वे चक्रीवादळाचा 215 कि.मी. प्रती तास असा वेग आहे. या वादळामुळे रॉकपोर्ट शहराला मोठा फटका बसला आहे. अनेक इमारती कोसळून पाच नागरिकांचा मृत्यू, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. शहरातील विविध परिसरातील वीज वादळामुळे खंडित करण्यात आली आहे. तेरा वर्षांतील हे मोठे वादळ झाले असून डोनाल्ड ट्रम्प लवकरच या परिसराला भेट देणार आहेत. हार्वे वादळामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत. पाऊस आणि वादळाचा जोर वाढला असल्याने येथील अनेक नागरिकांनी शहर सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

गेल्या तीन आठवड्यांत हाँगकाँगसह चीनच्या काही भागांत ’टी- टेन’, अमेरिकेत टेक्सासमधे ’ह्युस्टन’ या मोठ्या शहरात ’हार्वे’ व आता ’एर्मा’ या पृथ्वीच्या त्या त्या भागातील विक्रमी वेगाच्या चक्रीवादळांनी थैमान घातले. ’ह्युस्टन’ या शहरातील पाणी अजून ओसरले नाही. सागराच्या वाढत्या पातळीमुळे प्रशांत महासागरातील व लक्षद्वीपचीही काही बेटे अलीकडे पाण्याखाली गेली. हे वाढते वेग तापमानवाढ अनियंत्रित, अपरिवर्तनीय होत असल्याचे निदर्शक आहेत. अमेरिकेतील ’सी एन एन’ ही वाहिनी या नैसर्गिक – मानवनिर्मित दुर्घटनांची दखल घेऊन सतत वृत्तांकन करताना दिसते. भारतीय प्रसारमाध्यमे याकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रचलित विकासाचे विनाशकारी स्वरूप लपवले जात आहे. मुंबईत ’भुयारी मेट्रो-3 रेल्वे’ व ’सागरी रस्ता’, असे कालबाह्य व शहराची मृत्युघंटा वाजवणारे धोकादायक प्रकल्प रेटले जात आहेत. संकट, टाळ्या वाजवून ओढवून घ्यायचे व नंतर रडायचे, याला अर्थ नाही. हे प्रकल्प तत्काळ रद्द व्हावे. मुंबईकरांनी अमेरिकेच्या समोहनातून ताबडतोब भानावर येण्याची गरज आहे.आज युरोप व अमेरिकेचे असे प्रकल्प करण्याची हिंमत नाही. फक्त तीन ते पाच वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत 2ओसेने वाढेल व पाश्‍चात्त्यांसह सर्व जगाला औद्योगिकीकरणाबद्दल पश्‍चात्ताप होईल. ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे त्यांना ती आत्ताच होत आहे.

वाचकांनी सीएनएनवरील सध्या दाखवले जात असलेले पुढे सरकणारे, भुईसपाट करणारे वादळ जरूर पाहावे. पण त्याचवेळी तंत्रज्ञान व त्याने आणलेले औद्योगिकीकरण सोडावे लागणार याची जाणीव ठेवावी. नाही तर पन्नास वर्षांनंतरची वादळे पाहण्यास मानवजात जिवंत नसणार.

-अ‍ॅड. गिरीश राऊत
भारतीय पर्यावरण
चळवळ /वसुंधरा आंदोलन
9869023127