इस्लामाबाद : अफगाणिस्तानच्या सीमेलगत असणार्या वझिरीस्तान प्रांतात अमेरिकेकडून पुन्हा ड्रोन हल्ले करण्यात आलेेत. यामध्ये तालिबान-हक्कानी नेटवर्कच्या चौघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात तालिबानचा म्होरक्या सजना महसूद याचादेखील खात्मा झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत अमेरिकेकडून पाकिस्तानच्या हद्दीत करण्यात आलेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे.
ड्रोन हल्ल्यांना पाकचा विरोध
अमेरिका पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर वारंवार ड्रोन हल्ले करत असून, 24 जानेवारीरोजी केलेल्या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा एक कमांडर मारला गेला होता. अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया होत असलेल्या या भागात हक्कानी नेटवर्कच्या कमांडरसह इतर दोन जण मारले गेले होते. दहशतवादाला आश्रय देणार्या पाकिस्तानचा अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान अमेरिकेकडून करण्यात येत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना विरोध करीत आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांकडून दहशतवादाविरोधात चालवल्या जाणार्या मोहिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो.