नवी दिल्ली: अमेरिका आणि चीनमधील संघर्ष नवा नसला तरी या संघर्षाने आता रक्तरंजित वळण घेतले आहे. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या 12 एजंट्सची चीनमध्ये हत्या करण्यात आली आहे. 2010 ते 2012 मध्ये या हत्या झाल्या असून, या हत्यांनी अमेरिकेला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जाते.
सीआयएमधील 10 आजी-माजी अधिकार्यांनी न्यूयॉर्क टाइम्स या आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना चीनमधील धक्कादायक माहिती उघड केली. चीनमध्ये अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे जाळे सर्वात मोठे आणि सक्षम मानले जाते. पण चीनने अमेरिकेचे हे जाळेच मोडून काढले आहे. 2010 ते 2012 या कालावधीत चीनने सीआयएच्या 18 ते 20 एजंट्सची हत्या केली किंवा त्यांना तुरुंगात पाठवले. यातील एका एजंटची त्याच्या सहकार्यासमोरच हत्या करण्यात आली होती. सीआयएला इशारा देण्यासाठी हे कृत्य करण्यात आले होते, असे एका अधिकार्याने सांगितले.
अमेरिकेसाठी चीनमधील हेरगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी अमेरिकेने अत्यंत चलाखीने जाळे विणले. पण चीनने हे जाळेच मोडले असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. सीआयएसाठी हेरगिरी करणार्या या एजंट्सची माहिती चीनला कशी मिळाली याविषयी संभ्रम आहे. काही अधिकार्यांच्या मते, सीआयएमधील एखाद्याने ही माहिती लीक केली असेल, तर चीनमधील हॅकर्सनी ही गोपनीय माहिती मिळवली असावी असाही दावा केला जात आहे. अद्याप यावर ठोस माहिती हाती मिळू शकली नाही. पण अजूनही या घटनांचा तपास सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. सीआयए आणि एफबीआयने या वृत्तावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शीतयुद्धाच्या काळात रशियात अमेरिकी हेरांची हत्या झाली होती. अमेरिकेतील दोन अधिकार्यांनी ही गोपनीय माहिती रशियाला दिली होती. त्यानंतरची ही सर्वात मोठी दुसरी घटना असल्याचे जाणकार सांगतात.