अमेरिकेतील भारतीय कामगारांना दिलासा

0

वॉशिंग्टन । अमेरिकेतील व्हिसाधारकांच्या जोडीदाराचा नोकरी करण्याचा अधिकार काढून घेण्याबाबत निर्णय घेण्यास ट्रम्प प्रशासन विलंब करत असल्याने एच 1 बी व्हिसाधारक भारतीय कामगार व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे की, ए 4 व एच 1-बी व्हिसाधारकांच्या जोडीदारांचा नोकरीचा अधिकार काढून घेण्याबाबतचा निर्णय जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास तरी भारतीय कामगारांना दिलासा मिळाला आहे. सध्या अमेरिकेत भारतीय व्हिसाधारकांना वाईट दिवस आहेत. परंतु, त्यातून थोडा धीर मिळाला आहे.

ओबामांच्या काळात होती नोकरीची मुभा
सन 2015 मध्ये एच 1-बी व्हिसाधारकांच्या जोडीदारांना एच 4 अवलंबित व्हिसाच्या आधारे नोकरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. ज्यांच्या जोडीदारांना नोकरीचे अधिकार मिळणार आहेत ते ग्रीनकार्डधारक आहेत. या निर्णयास विलंब होण्याचे कारण म्हणजे ट्रम्प प्रशासन त्याचे परिणाम तपासून पाहात आहे. ओबामा प्रशासनाच्या काळात एच 1-बी धारकावर अवलंबित एच 4 व्हिसाधारक व्यक्तींना काम करण्याची मुभा होती. आता ही मुभा रद्द करण्याबाबत 28 फेब्रुवारीला निर्णय होणे अपेक्षित होते. तूर्त नोकरी जाण्याच्या आपत्तीपासून दिलासा मिळाला आहे.