वॉशिंग्टन : एका 25 वर्षीय भारतीयाची याकीमा, वॉशिंग्टन येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विक्रम जरयाल असे त्याचे नाव असून तो ज्या स्टोअर्समध्ये काम करत होता तेथे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांनी त्याच्याकडे रोकडची मागणी केली ती न दिल्याने त्यास गोळ्या घालण्यात आल्या. विक्रम पंचवीस दिवसांपूर्वीच अमेरिकेत कामानिमित्त गेला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेतील भारतीय वकिलातीला सुचना दिल्या आहेत. सर्व प्रकारची मदत देण्याचे अश्वासनही स्वराज यांनी मृत विक्रम यांच्या भावाला ट्विट करून दिले आहे. मृत विक्रम जरयाल हा पंजाब राज्यातील सुकरेन होशीरपूर येथील राहणारा आहे. त्याच्या वडीलांचे नाव पुरूषोत्तम सिंह असे आहे. याकीमा पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या दोन दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात विक्रम जयराल जखमी झाला त्यास रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचा तपास सुरू असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण अस्पष्ट असल्याने अन्यत्र मिळालेल्या चित्रणावरून पोलिस मारेकर्यांचा शोध घेत आहेत.