वाशिंग्टन : जगातील ११४ देशांमध्ये कोरोना विषाणू पसरला असून, आतापर्यंत ४ हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत २ हजार नागरिकांना याची लागण झाली असून ४१ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलीय. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 50 अब्ज डॉलरची तरतूदही करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
जागतिक आरोग्य संघटना प्रमुख टेड्रोस गेब्रेसियोस यांनी सांगितले की, चीनच्या तुलनेत युरोपीयन देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत आहे. एकट्या इटलीमध्ये मृतांचा आकडा १ हजार २६६ झाला आहे. तर १७ हजार ६६० लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देश आता खबरदारीचा उपाय अवलंबताना दिसत आहे. युक्रेनने परदेशी नागरिकांना आपली सीमा बंद केली. येथे तीन जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव ऑफ्रिकन खंडातील सुमारे १८ देशांमध्ये झाला आहे.
भारत सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द केले आहेत. याचा अर्थ भारतात कोणीही परदेशी पर्यटक दाखल होऊ शकणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला. यात फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा १५ एप्रिलपर्यंत मिळणार नाही