वॉशिंग्टन: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या साडे चार लाखांहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या १७ हजारांहून अधिक झाली असून गेल्या २४ तासांत अमेरिकेत २१०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
युरोप, अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. इटली व स्पेनमध्ये मागील काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत स्थिरता आल्याचे चित्र आहे. जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. भारतात करोनाबाधितांचा आकडा ६७६१ वर पोहचला. यामध्ये ७१ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तर शुक्रवारी मृतांची संख्या २०६ वर पोहचली. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे, आत्तापर्यंत ५१६ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे.