अमेरिकेला भारताचा झटका

0

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजीत भेटीपुर्विच भारताने अमेरीकेला झटका दिला आहे. भारताने अमेरिकेसोबतचा साडे सहा कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे. अमेरिकेकडून 16 हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती. हेलिकॉप्टरच्या किमतीवर बराच काळ भारत आणि अमेरिकेत वाटावाटी सुरु होत्या. यानंतर संरक्षण मंत्रालयाने हेलिकॉप्टर खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

25 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर
अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी सिकोरस्की एयरक्राफ्टकडून भारत 16 हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याआधीच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे. नौदलासाठी संरक्षण मंत्रालयाकडून हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती. संरक्षण मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. यावेळी मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता
संरक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात वाढ न करण्यात आल्याने सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आहे. त्यामुळेच सैन्यासाठी खरेदी करण्यात येणारी उपकरणे आणि विमाने यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी करण्यात येत आहेत. ‘संरक्षण मंत्रालयाने 16 हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. मात्र हेलिकॉप्टर खरेदीचा करार गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. यादरम्यान हेलिकॉप्टरच्या किमतीवरुन बर्‍याचदा वाटाघाटी झाल्या होत्या. अमेरिकीची विमान निर्मिती क्षेत्रातील कंपनी सिकोरस्कीने या कराराचा कालावधी वाढवण्यास नकार दिला. त्यामुळेच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला,’ आहे.