अमेरीकेतही उभारली मराठी नववर्षाची गुढी

0

गुढीपाडवा घेऊन येतो नव चैतन्याचा गोडवा – शास्त्री भक्ती स्वरूपदासजी

फैजपूर- मराठी नूतन वर्ष गुढी पाडव्याचा सण पेलेटाईन, शिकागो, अमेरीका येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या नवचैतन्य स्वरूप कार्यक्रमात शास्त्री भक्ती स्वरूपदासजी यांनी आपल्या अमृत वाणीतून गुढीपाडव्याचे महत्त्व तसेच या दिवशी ब्रम्हाजी यांनी श्रृष्टीची रचना केल्याने संपूर्ण वनराई-प्राणिमात्रांमध्ये अमृताची वर्षा होत असल्याचे सांगून याच पवित्र दिवशी भगवान रामचंद्र यांनी वालीचा वध करून ते अयोध्येत परत आले. तसेच भगवान श्रीकृष्ण यांनी द्वापारयुगामध्ये स्वतः राज्य कारभार स्वीकारला होता आणि नवीन राज्याची स्थापना केली व लोकांनी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला होता, अशी विविध प्रसंगानुरूप दाखले देऊन सर्व भाविक-भक्त गणांना अमूल्य अशी कथा सांगितली.

महाराष्ट्रीयन भाविकांची उपस्थिती
प.पू.स्वयंप्रकाशस्वामीजी, पार्षदवर्य दीपक भगतजी तसेच भारत भूमीतून येथे वास्तव्यास असलेले अमेरीकेतील वेगवेगळ्या राज्यातील गुजराथी, दक्षिणी आणि बहुसंख्य महाराष्ट्रीयन असे 250 ते 300 भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व प्रथम कीर्तन, गुढी पूजन, भगवान श्री स्वामीनारायण यांचा महाभिषेक करण्यात आला. त्या नंतर भगवंतांची आरती करून या सोहळ्यानंतर भारतीय पारंपरीक महाप्रसादाचा सर्वाना लाभ देण्यात आला. सर्वांनी सोहळ्याचा उत्स्फूर्त लाभ घेतला. प्रामुख्याने अर्जुनभाई मालविया श्री स्वामीनारायण मंदिराचे अध्यक्ष हे सुध्दा उपस्थित होते. या गुढीपाडव्याच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पराग दवे, विकाल पटेल, हिमांशू भाई, धृव भाई यांनी विशेष परीश्रम घेतल्याचे शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांनी पॅलेंटाईन येथून ‘जनशक्ती’ प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.