मुंबई : अखेर मराठी तरुणाने बनवलेल्या आणि भारतीय मातीत तयार झालेल्या पहिल्या वहिल्या विमानाची चाचण्या घेण्यास डीजीसीएकडून परवानगी मिळाली असून, त्यानिमित्ताने अमोल यादव यांनी सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. डीजीसीएचे रजिस्ट्रेशन मिळावे यासाठी अमोल यांनी 2011 ला अर्ज केला होता. डीजीसीआयने 17 नोव्हेंबरला त्यांच्या सहा आसनी विमानाला नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. या प्रमाणपत्रामुळे अमोल यादव यांच्या 6 वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पुढच्या 10 दिवसांत या विमानाची तपासणी होणार असून, या विमानाला उड्डाणासाठी आवश्यक हिरवा कंदील मिळू शकेल.
18 वर्षांच्या मेहनतीला अखेर यश
मूळचे सातार्याचे रहिवासी असणार्या अमोल यांच्या 18 वर्षांच्या मेहनतीला अखेर यश प्राप्त होणार आहे. मुंबईत राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच अमोलचे प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा सर्वासमोर आला आहे. एवढेच नव्हे तर यादव यांना सरकारने पालघर इथे विमाननिर्मितीसाठी काही एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी अमोल यादव यांना सर्व सहकार्य केले जाईल आणि सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहे.
डीजीसीएकडून लागला होता ब्रेक
डीजीसीएकडून अमोल यादव यांना परवानगीत सातत्याने अडथळे आणले जात होते. अर्ज हरवला, नियम रद्द केले अशी अनेक कारणे अमोल यादव यांना डीजीसीएकडून देण्यात आली. 2016च्या मेक इन इंडिया प्रदर्शनात त्यांनी मोठी हिम्मत दाखवून अखेर आपले विमान प्रदर्शनासाठी दाखल केले. तेथेही त्यांना मोठा विरोध झाला, मात्र त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्याकडून अमोल यादव यांच्या या संघर्षाची दखल घेतली गेली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चार वेळा यासाठी बोलणी केली आणि अखेर डीजीसीएला त्याची दखल घ्यावी लागली.
विमानाचे नाव असेल व्हीटी-एनएमडी
भारतात विशेषतः महाराष्ट्रात विमाननिर्मिती सुरू करण्याचे हे स्वप्न हे अमोल यादव यांच्या एकट्याचे स्वप्न राहिले नसून, आता ते पंतप्रधान आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारचे स्वप्न झाले आहे. त्यामुळेच या विमानाचे नाव व्हीटी-एनएमडी आहे. एनएम म्हणजे नरेंद्र मोदी आणि डी म्हणजे देवेंद्र असा त्याचा अर्थ होत असल्याचे अमोल यादव यांनी स्पष्ट केले.