नवी दिल्ली : ‘अम्फान’ वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जोरदार तडाखा दिल्याने आत्तापर्यंत ८० जणांनी प्राण गमावले असून जवळपास एक लाख कोटींचे नुकसान झाल्याचंही समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्ध्वस्त झालेल्या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. हवाई पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाचक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी १००० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केलीय. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहे.
देशात करोना व्हायरसचं संकट आहे. याच वेळेत पूर्व भागाला अम्फान वादळाचा तडाखा बसला. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून या महाचक्रीवादळाला तोंड देण्याची तयारी केली होती. परंतु, त्यानंतरही ८० जणांचा जीव आम्ही वाचवू शकलो नाही. या चक्रीवादळात संपत्तीचंही मोठे नुकसान झाले असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.