काळ बदलत असतो. तसे सभोवतालीही बदल होत असतात. बदलत्या काळानुसार माणसेही बदलतात. सध्याच्या ई-काळात तर बदल जरा जास्तच झपाट्याने होताना दिसतात. एखादे सॉफ्टवेअर लोकप्रिय ठरले तर लगेच त्याच्यात काही बदल करुन पुढचे अपडेटेड व्हर्जन बाजारात येते. ते जर पहिल्यापेक्षा पुढे नेणारे, जास्त उपयोगी असेल तर लोक स्वीकारतात, नाहीतर पहिल्याचीच आठवण काढत नवे नाकारतात. राजकारणातही व्यक्ती, मुद्दे यांच्याबाबतीत तसे होताना दिसते. ताजे उदाहरण तामीळनाडूचे आहे.
अण्णा द्रमुकच्या लोकप्रिय नेत्या, माजी मुख्यमंत्री जयललिता उर्फ अम्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या निकट सखी शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस निवडल्या गेल्या. त्या पक्षाच्या घटनेनुसार सरचिटणीस म्हणजे सर्वसत्ताधीश. मुख्यमंत्री असताना जयललिता अम्माच सरचिटणीस होत्या. त्यांच्या जागी शशिकलांची निवड झाल्यावर स्वाभाविकच त्याच पक्षामध्ये सर्वसत्ताधीश हे स्पष्ट झाले होते.
फक्त प्रश्न एवढाच होता की त्या जयललितांप्रमाणेच पक्षाच्या सत्तेच्या जोडीलाच सरकारमधील सत्ताही स्वीकारणार का? किंवा पक्षातील सत्ता वर्तुळ त्यांना सरकारमधील सत्ताही सोपवणार का? गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत होत्या त्यातून मिळणारे संकेत शशिकलाच सर्वसत्ताधीश होणार हे स्पष्ट करणार्याच होत्या. मात्र पक्षातील काहींना, तसेच जयललिताच्या पुतणीला दिपाला मात्र शशिकलांना सत्ता मिळणे मान्य नाही. त्यांनी विरोधही केला. मात्र अम्मांच्या निधनानंतर जे घडत गेले त्यातून रक्ताच्या नात्यापेक्षा सध्यातरी मैत्रीच्या नात्याला महत्व मिळणार असल्याचे स्पष्ट होत गेले.
शशिकला या जयललितांच्या जवळच्या जरी होत्या तरी त्यांचे नाते अगदी सुरुवातीपासूनचे नव्हते. तसेच त्या नात्याच्या आपुलकीत सातत्य नव्हते. मुळात द्रमुकच्या करुणानिधींच्या उपस्थितीत लग्न केलेल्या शशिकला यांना अम्मांचा वाढता प्रभाव लक्षात आला आणि त्या आपल्या पतीच्या माध्यमातून काही सरकारी अधिकार्यांच्या मदतीने जयललितांच्या जवळ पोहचल्या. त्यावेळी जयललिता या पक्षाच्या प्रचार चिटणीस होत्या. आपल्या वागण्यातून शशिकलांनी जयललितांचा विश्वास संपादन केला. अगदी त्यांच्या मुलालाही जयललिता मुलगा मानू लागल्या. मात्र पुढे घटनाक्रम असा घडला की त्यांना ही मैत्रीण खूपच त्रासदायक ठरली. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना तुरुंगाचीही वारी करावी लागली. अखेर 2011मध्ये तर शशिकलांची त्यांच्या कुटुंबीयांसह अण्णाद्रमुकमधून हकालपट्टीही करण्यात आली. मात्र हार मानतील त्या शशिकला कसल्या? त्यांनी अम्मांची मनधरणी केली. लेखी माफीनामा दिला. आपल्या कुटुंबीयांशी नाते तोडले. आणि पुन्हा त्या जयललितांच्या जवळ पोहचल्या.
शशिकलांनी अम्मांचा वारसा लक्षात ठेवला. एमजीआर म्हणजेच एमजी रामचंद्रण यांचा राजकीय वारस होताना जयललिता अम्मांना त्यांच्या नातेवाईकांकडून असाच विरोध झाला होता. एमजीआरच्या निधनानंतर जसं अम्मांनी त्यांच्या कलेवराची साथ सोडली नव्हती तसेच शशिकलांनी केले. एवढेच नव्हे तर मरिना बीचवरील अंत्यसंस्कारांच्यावेळी तर त्यांच्या नेतृत्वास आव्हान देऊ पाहणार्या दीपा यांना तेथे प्रवेशही मिळू शकला नाही! आपल्या आत्याचा अंत्यसंस्काराचा राजकीय लाभ त्यांनी दीपाला मिळू दिला नाही. सर्व प्रकाशझोत स्वत:वरच ठेवला.
आधी राजकारण नको म्हणत नंतर त्या अण्णाद्रमुक मुख्यालयात अवतरल्या त्या अम्मांच्याच शैलीत. तसेच कपडे. केस बांधण्याची पद्धत. तशीच गाडी. बसण्याची तिच पद्धत. एवढेच नव्हे तर अम्मांप्रमाणेच बोलणे. अगदी पक्षाच्या सरचिटणीसपदी निवडीची घोषणा झाल्यावर केलेल्या भाषणात पुढील शंभर वर्षे अण्णाद्रमुकच सत्तेत राहील असे जोरकस प्रतिपादन करताना एका हाताला उंचावून एक बोट आकाशाकडे करण्याची त्यांची लकबही अम्मांची आठवण करुन देणारी. त्यामुळेच अण्णाद्रमुक नेत्यांनी ङ्गचिन्नाम्माफ म्हणजे चिट्टी म्हणजेच आईची धाकटी बहीण ही उपाधी त्यांना दिली तीही राजकारणातील रिकामी जागा भरण्यासाठीच्या प्रतिमानिर्मितीसाठी योग्यच!
त्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून अम्मांचे भरत पनिरसेल्व्ह काम पाहत असताना त्यांनी कधीही त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे हे दर्शवले नाही. अम्मा गेल्या मात्र भरत बदलला नाही. किंवा इच्छा असूनही ङ्गचिन्नामाफ काय आहेत ते माहित असल्याने त्यांना बदलता आले नसावे. आज अण्णा द्रमुकच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर चिन्नामाने पक्षाच्या ट्विटर हँडलवर व्यक्त केलेल्या भावना बोलक्या आहेत. त्या म्हणाल्यात, पनिरसेल्व्हमच पहिले होते ज्यांनी मला सरचिटणीसपदाचा आग्रह धरला आणि आता मुख्यमंत्रीपदाचाही!
राजकारण असे असते. भरतासाठी राम होता. आताच्या राजकारणात राम नसला तरी भरताला सिंहासनाची अपेक्षा बाळगताच येत नाही. बाळगली तर विभिषण व्हावे लागते! चिन्नाम्मा आता 9 फेब्रुवारीला शपथ घेतील. जयलिलिता अम्माच्या जवळ राहून त्या डाव-प्रतिडाव, भावनात्मक राजकारण शिकल्या आहेत. काही डाव त्यांनीही रचले असतील. आता अम्मांचे रूप-राहणीची नक्कल करताना त्यांच्या शैलीचीही त्या नक्कल करतील. फक्त त्यांच्यासारखे सामान्य माणूस केंद्रीत कारभार त्या करतील का यावर त्यांचे आणि पक्षाचेही पुढचे भवितव्य अवलंबून आहे. शेवटी त्या अम्मा व्हर्ज-2 बनण्याच्या प्रयत्नात असल्या तरी त्यांच्या उपयोगितेवर त्यांची लोकप्रियता आणि सत्तेतील स्थान ठरेल. नाहीतर काहीवेळा अपग्रेडेड म्हणून आलेले अपडेटेड व्हर्जनही बाद ठरवले जाते. तसेचट अम्मांच्या चिन्नाम्मा व्हर्जनच्या बाबतीत घडेल.